प्रियकरावर ऍट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
जामखेड – प्रियकरासाठी प्रेयसी सासर सोडून माहेरी राहण्यास आली. मात्र प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने आपल्या रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सागर सुरेश डोके याच्या विरोधात ऍट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत प्रेयसी (वय 22) हिचे व आरोपी डोके या दोघांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र तीचे हिचे लग्न होऊन ती सासरी नांदायला गेली होती. मात्र तरी देखील दोघांचे प्रेमसंबंध सुरूच होते. आरोपीने लग्न करतो, असे आश्वासन दिले होते.
त्यामुळे प्रेयसीने ही आपल्या नवऱ्याला सोडून माहेरी भुतवडा येथे राहण्यासाठी आली होती. शनिवारी (दि.13) दुपारी गावात भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. यावेळी प्रेयसीस भेटण्यास डोके आला होता. यावेळी तीने त्यास लग्नाबद्दल विचारले असता, त्याने मी लग्न करणार नाही, असे सांगून तो निघून गेला. त्याचा धक्का बसल्याने त्याच दिवशी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तीने आपल्या राहात्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यानंतर मुलीच्या भावाने माझ्या बहिणीच्या आत्महत्येस आरोपी सागर डोके हाच कारणीभूत आहे, असा आरोप केला. मयत मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सागर सुरेश डोके याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कर्जत-जामखेडचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव हे करत आहेत.