लंडन – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चौकसीने अँटीगुआ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. चौकसीने आपल्या तक्रारीत म्हटलं की, काही दिवसांपूर्वी ८ ते १० लोकांनी मला निर्दयतेने मारहाण केली. मारहाण करणारे लोक स्वत:ला अँटीगुआ पोलीस असल्याचं भासवत होते, असंही चौकसीने म्हटलं.
चौकसीने तक्रारीत आरोप केला की, माझी गर्लफ्रेंड बारबरा जबेरिका माझं अपहरण करण्याच्या कटात सामील होती. मला एवढी मारहाण करण्यात आली की, मी कसाबसा शुद्धीवर आलो. त्यांनी माझा फोन, घड्याळ आणि मोबाईल हिसकावून घेतला. मात्र आम्ही तुला लुटणार नाही, असं म्हणत माझे पैसे परत केल्याचे चौकसीने सांगितलं.
मेहुल चौकसीने म्हटलं की, मागील एका वर्षापासून माझी बारबरा जबेरिका हिच्यासोबत मैत्री आहे. २३ मे रोजी तिने मला घरी बोलवलं होतं. जेव्हा मी गेलो, तेव्हा तेथे उपस्थित ८ ते १० लोकांनी मला निर्दयतेने मारहाण केली. जेव्हा मला मारहाण करण्यात येत होती, तेव्हा बारबराने मला वाचविण्याचा प्रयत्नही केला नाही.
दरम्यान मला मारहाण होताना बारबरा ज्या पद्धतीने वागली त्यावरून हे स्पष्ट होत की, माझं अपहरण करण्यात तिचा हात होता, असं चौकसीने म्हटलं. अँटीगुआमध्ये दडून बसलेला चौकसी काही दिवसांपूर्वी बेपत्ता होता. त्याच्या बेपत्ता असण्याची तक्रार देखील देण्यात आली होती.