एका आठ वर्षीय चिमुकलीने फादर्स-डे निमित्ताने आपल्या दिवंगत वडिलांना पत्र लिहल्याची एक भावनिक घटना समोर आली आहे. आपले वडील या जगात नसल्याने तिने या पत्रावर चक्क स्वर्गाचा पत्ता लिहीत ते पोस्ट बॉक्समध्ये टाकलं.
यानंतर सिमोन नामक एक पोस्टमन पोस्ट बॉक्समधील पत्र गोळा करत असताना त्यांच्या हाती हे पत्र लागलं. पत्रावर वैध तिकिटं व पत्ता नसल्याने ते कायस्वरूपी धूळखात पडेल हे सिमोन यांना माहिती होत. असं होऊ नये म्हणून त्यांनी ते सोशल मीडियावर पोस्ट करत त्या चिमुकलीच्या कुटुंबीयांचा शोध घेतला.
सोशल मीडियावर सिमोन यांच्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला व काही वेळातच ते पत्र सारा टल्ली यांच्या आठ वर्षीय मुलीचं असल्याचं समोर आलं. यानंतर सिमोन यांनी सारा यांची भेट घेत ते पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केलं.
सारा यांनी याबाबत माहिती देताना, ‘आमची मुलगी चार महिन्यांची असताना पती टोनी टल्ली यांचं निधन झालं. यानंतर आमची मुलगी आपल्या दिवंगत वडिलांना पत्र लिहून आपलं प्रेम व्यक्त करत असते. ती तिच्या वडिलांना खूप मिस करते.’ असं सांगितलं.
‘मी हे पत्र व समाज माध्यमांवर आलेल्या प्रतिक्रियांचे स्क्रिनशॉट जपून ठेवणार असून माझी मुलगी मोठी झाल्यानंतर हे सर्व तिला दाखवणार आहे.’ असंही सारा यांनी सांगितलं.