नाशिकमधील धक्कादायक प्रकार उघडकीस
नाशिक – शालेय साहित्य घेण्यासाठी मुलीने पैसे मागितल्याने संतापलेल्या बापाने तिला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. हा प्रकार दारुच्या नशेत आरोपीने केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पंढरीनाथ बोराडे असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या संबंधित मुलीने शालेय साहित्य विकत घेण्यासाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली. मात्र, दारुड्या पित्याला या गोष्टीचा राग आल्यामुळे त्याने थेट मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नाशिकमधील शिंदे गावात शुक्रवारी रात्री घडला.
आरोपीचा मुलीच्या शिक्षणाला विरोध होता. शुक्रवारी रात्री पंढरीनाथ बोराडे दारु पिऊन घरी आल्यानंतर मुलीने त्याच्याकडे अभ्यासाची पुस्तकं विकत घेण्यासाठी पैसे मागितले. मात्र याचा राग आल्यामुळे त्याने मारहाण करत मुलीला घरातील कीटकनाशक पाजले. मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत धाकट्या मुलाने वडिलांविरोधात पोलिसात तक्रार दिल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. त्यानंतर आरोपी पंढरीनाथ बोराडेला नाशिक रोड पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.