पोलिसांच्या सहृदयतेने वाचवले चिमुरडीचे प्राण

चेन्नई : करोनाने लादलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांचे जीवनमान मुश्‍किल झाले आहे. दोन वेळच्या भाजी पोळीसाठी त्यांचा संघर्ष तीव्र बनला आहे. मात्र, त्याच वेळी मानवतेची अथांग कहाणीही पाहायला मिळत आहे. अशीच एक कहाणी चेन्नईत घडली.
त्याचं झालं असं, अवघ्या पाच वर्षाच्या चिमुरडीला हृदयात गुंतागुंत निर्माण झाली. त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यासाठी पाच लाख रुपये खर्च येणार होता. त्यातच तिचे वडील कार्तिक यांची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली होती. त्यामुळे पैशाची तजवीज होऊ शकत नव्हती.

ही घटना पोलीस हवालदार पी. सेंथीलकुमार आणि पोलीस निरीक्षक एम. थांगराज यांना समजली. चिमुरडीला वाचवायचेच या भूमिकेतून त्यांनी मदत गोळा करून रुग्णालयाचे सारे शुल्क भरले.

लॉकडाऊनच्या आधीच अँजिओग्राम काढण्याची सूचना डॉक्‍टरांनी केली होती. मात्र पैसे नसल्याने त्यांनी ते पुढे ढकलल्याचे समजताच मी आणि माझ्या पत्नीने कार्तिक यांची समजूत काढली. त्यांना 30 हजार रुपये दिले असे सेंथिलकुमार सांगत होते.

त्यानंतर पोलीस ठाण्यातून आणखी 45 हजार रुपये गोळा केले. सव्वा लाख रुपये सरकारी योजनेतून मिळाले. तर अन्य तीन लाखांसाठी देणगीदार शोधले. त्यामुळे आवश्‍यक निधी उभा राहिला. महिन्याभरापूर्वी चिमुरड्या कविश्‍कावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 15 दिवस ती अतिदक्षता विभागात होती. 15 दिवस जनरल वॉर्डमध्ये ठेवल्यानंतर तिला 11 जुलैला घरी सोडण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.