मुलगी असते आईचे प्रतिरूपच…

आमच्या लहानपणी आम्ही नेहमीच आई-वडिलांचे ऐकले आणि कुठल्याही गोष्टीला “का?’ असे नाहीच विचारले. हा त्यांना दिलेला मान, आदर किंवा थोडी भीती असंही म्हणू शकतो आपण. आई-वडील आपल्या भल्यासाठीच सांगतात, हा लहानपणापासून मनावर संस्कार (अर्थात चांगलाच) झालेला असल्यामुळे कधी कुठलीही गोष्ट आपण का करत आहोत, कशासाठी करत आहोत, असं नाही आलं मनात. पण आजकालची पिढी तशी नाहीये. प्रत्येक गोष्टीची त्यांना कारणे हवी असतात आणि तेही चुकीचे नाहीये. पण आम्ही विचारली नाहीत कारणे. मग आम्ही बावळट होतो का? तर तसं नाहीये मुळीच. त्या त्या काळाला साजेसे आणि अनुरूप वागणे, हे चुकीचे नाही, तर समजूतदारपणाचे लक्षण असते.

आईने सांगितले म्हणून आम्ही कधीही तोकडे कपडे घातले नाहीत. सातच्या आत खेळून घरात आलो. संध्याकाळी दिवेलागणीला देवासमोर शुभंकरोती म्हंटले आणि नऊ साडेनऊपर्यंत झोपीही गेलो. मला आठवते, मी अकरावीला असताना एक जीन्स आणलेली होती. तेव्हा माझी आई माझ्याशी दोन दिवस बोलली नव्हती. खरं तर जीन्स तर काही अंगप्रदर्शन करणारा वेष नाही. त्यात संपूर्ण अंग झाकलं जातं. पण मुलींसाठी इतके कपडे असताना जीन्स कशाला? हे माझ्या आईचे म्हणणे. नंतर एका चुलत बहिणीने तिला समजावले, “अगं काकू, छान दिसत आहे की हिला जीन्स! कुठे काही अंगसुद्धा दिसत नाहीये,’ तेव्हा जरा आई शांत झाली.

चाकोरीबाहेरचे मुलींनी जगणे तेव्हा आयांना मान्यच नव्हते. प्रेम होते, पण धाकही जास्त. त्यामुळे आईवर प्रेम असूनही असे वाटले, व्यक्तच नाही झालो आपण. आई ही ना एक मैत्रीण असावी. तेव्हा माझ्या आईसारख्याच आया होत्या प्रत्येक घरात. काळजीपोटी मुलींना लावलेली शिस्त त्यांना, मैत्री होईल इतक्‍या जवळ येऊ देत नव्हती एकमेकींच्या. जे आपल्याला जगता आले नाही मुक्त, स्वच्छंदी, मोकळेपण म्हणजे स्वैर नाही, ते आपल्या मुलीने जगावे, असे त्यांना कधी वाटलेच नाही का?

“आपल्याकडे बघणाऱ्या प्रत्येकाची नजर चांगली नसते’, केवळ हेच सांगत आपल्याला समाजात मिसळायला आपोआप थोडी बंधनं घालण्यात आली. “मुलीची अब्रू म्हणजे काचेचे भांडे, जपायला लागते,’ हेच ऐकत ऐकत आपण मोठे कधी झालो कळले नाही. हे अगदी मान्य की आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपली आई आपल्याला जपत होती. पण पुढे होणारे वाईट परिणाम, किंवा त्याला तोंड कसे द्यायचे, माणूस कसा ओळखायचा, हे मात्र आपल्याला कमी प्रमाणात सांगितले गेले. डोक्‍यावरून हात फिरवत माया केली. पण लढायला नाही सांगितले. कारण त्या आधीच बंधनं घातली गेली होती. “इकडे नको जाऊस गर्दी असते;’ “तिकडे नको जाऊस, माणसं चांगली नसतात,’ असंच सारखं.

आजकाल आया इतक्‍या मोकळ्या वागतात मुलीशी. एकतर राहणीमानामुळे त्यांच्या वयात फार फरक दिसत नाही. त्या मुलींच्या अडचणी समजून घेतात. अगदी मैत्रिणीचे नाते जपतात. कुठल्याही गोष्टीचे होणारे बरे-वाईट परिणाम समजावून सांगताना, निर्णय मात्र त्यांचा त्यांना घ्यायला सांगतात. त्यांना सक्षम बनवतात. कोणताही निर्णय त्यांच्यावर लादत नाहीत. एखादी गोष्ट चूक असेल तर, केवळ राग, आरडाओरडा न करता त्यांना त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती वाईट कशी आहे, हे समजावून सांगतात. अगदी अजूनही टाळल्या जाणाऱ्या सेक्‍स ह्या विषयावरसुद्धा मुलींना आधीच सांगितले जाते आणि ते अगदी आजकालच्या जगात आवश्‍यकच आहे.

त्यावेळी आम्हाला साधा टीव्ही बघायलासुद्धा मनाई असायची. आजची आई आपल्या मुलीसमवेत मल्टिप्लेक्‍सला जाऊन नवीन हिंदी मूव्ही बघते आणि त्याचा आनंद घेत त्यावर चर्चा, विनोद करत दोघींमध्ये सुसुंवाद घडतो. अतिधाकाने, अतिशिस्तीने बिघडलेली मुलं मी स्वतः बघितली आहेत. गोष्टीच्या मुळाशी न जाता ती वाईटच असते, असा पूर्वग्रह धरून ती मुलांनी आणि मुलींनी करणे उगाचच नाकारले गेले. आई ओरडेल म्हणून कित्येक गोष्टी तेव्हा लपवल्या जायच्या. ह्यातून चांगले नाही तर वाईटच परिणाम व्हायचे. तेव्हा एखाद्या मुलासोबत मुलीची मैत्री दिसली की, लोकं नाकं मुरडायची. तिखट-मीठ लावून नसलेली नाती निर्माण करायची. पण आज मुलींचे मित्र घरी येतात. एकत्र सहलीला जाणे, मुव्ही बघायला जाणे, हेही मोकळेपणाने घडत आहे. निखळ मैत्रीला कशाला ना उगाचच नाकारायचे नाही का?

प्रत्येक मुलगी ही आईचे प्रतिरूप असते…
ती जगत असते
आपल्या आईची अपूर्ण स्वप्नं…
ती सुंदर असते तिच्या आईमुळे,
तिच्या डोक्‍यावरून
हात फिरवताना,
आई माया आणि प्रेम करताना,
एका बाजूने जाणून घेत असते तिचे अंतरंग.
ती केवळ डोळ्यांनीच सांगते,
पुढील धोका, काळजी…
आणि देत असते संदेश
कसे वागायचे याचा…
वंशवेलीवर उमललेले हे फूल
जपणारी आईसुद्धा…
एका आईची मुलगी असते,
तिला आपल्या मुलीला
बनवायचे असते भक्कम वृक्ष.
तिला जपत, तिला आधार देत,
पाठिंबा देत आणि,
वेळ आल्यावर नकारसुद्धा…
कारण प्रत्येक मुलगी असते
तिच्या आईचं प्रतिरुपच!!!

– मानसी चापेकर

Leave A Reply

Your email address will not be published.