पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासाेबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर शस्त्राचा धाक दाखवत तिघांनी बलात्कार केला. तरुणीच्या मित्राने तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याबाबतची प्राथमिक माहिती कोंढवा पोलिसांना दिली.
पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची दहा पथके आरोपींच्या मागावर रवाना झाली आहेत. तीन दिवसांपूर्वी याच परिसरात तरुणीचे अपहरण करुन विनयभंग करण्यात आला होता.
पीडित तरुणी मूळची गुजरातची, तर मित्र जळगावमधील आहे. मुलगी इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेते, तर मुलगा सीए झाला आहे. हे दोघे रात्री अकराच्या सुमारास बोपदेव घाट परिसरात डोंगर उताराला गप्पा मारत थांबले हाेते.
दरम्यान, रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणाला मारहाण करत कोयता, बांबू आणि चाकूचा धाक दाखवत एका जागी बसायला लावले. यानंतर तरुणीला डोंगराच्या उतारावर खाली नेत धमकावून सामूहिक बलात्कार केला.
त्यानंतर तिघेही पसार झाले. यानंतर मुलीने येऊन मित्राला घडलेली घटना सांगितली. तरुणीला मित्राने एका खासगी रुग्णालयात नेले. तेथून तिला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. ससून प्रशासनाने याबाबतची माहिती (एमएलसी) पहाटे पाच वाजता कोंढवा पोलिसांना दिली.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी तातडीने तपास करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी दोघा आरोपींचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहेत.
तरुणीच्या मित्राने तिला रुग्णालयात दाखल करत नातेवाईकांना माहिती दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बलात्कार करुन पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी दहा पथके तयार केली आहेत. – रंजन शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे
अत्याचाराच्या वाढत्या घटना
शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वानवडी परिसरात एका शाळेतील दोन मुलींवर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाने अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (३ ऑक्टोबर) उघडकीस आली.
पोलिसांनी गाडीचालकाला अटक केली. संतप्त कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड केली होती. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचे संतप्त पडसाद उमटले होते. विविध संस्था, संघटना, तसेच राजकीय पक्षांनी याप्रकरणी आंदोलन केले होते.