जीआयआयएस मुलींचा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

पुणे: चिंचवड येथील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल प्रशालेच्या (जीआयआयएस) मुलींच्या फुटबॉल संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना सीबीएसईच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. ही स्पर्धा नोयडा येथे जेबीएम ग्लोबल स्कूलच्या मैदानावर 9 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

सीबीएसईच्या दक्षिण विभागाच्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवून ग्लोबल इंटरनॅशनल प्रशालेच्या मुलींच्या संघाने 17 वर्षांखालील गटात ही कामगिरी केली. जीआयआयएसफ प्रशालेला अंतिम सामन्यात मुंबईच्या रायन इंटरनॅशनल प्रशाला संघाकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला. शहरातून 2019-20च्या मोसमासाठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणारी जीआयआयएसफ ही एकमेव प्रशाला ठरली आहे. सीबीएसईफच्या नियमानुसार प्रत्येक विभागातील अव्वल दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतात.

बेळगाव येथे झालेल्या जीआयआयएसफ प्रशाला संघाने प्रथमच विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळविला होता. यामध्ये सीबीएसईच्या बंगळुरू, पुणे आणि तिरुअनंतपुरम येथील 32 शाळांचा सहभाग होता. पहिल्या फेरीत त्यांना बाय मिळाला होता.

जीआयआयएसच्या संघात इयत्ता सातवी ते 11 वीपर्यंतच्या खेळाडूंचा समावेश होता. अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात त्यांनी पीएसबीबी लर्निंग लीडरशीप ऍकॅडमी, बंगळूर (3-2, पेनल्टीशूट आऊट), एसईएस गुरुकुल स्कूल, पुणे (3-2, पेनल्टी शूटआऊट), स्कूल ऑफ स्कॉलर्स, वर्धा नागपूर (3-0) या शाळांचा पराभव केला. या प्रवासात त्यांनी यावर्षी पुणे विभागाच्या जिल्हा परिषदेच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या एसईएस गुरुकुल आणि वर्धा येथील जिल्हा परिषदेच्या
स्पर्धेतील विजेत्या स्कूल ऑफ स्कॉलर्स या अव्वल संघांचा पराभव केला. जीआयआयएसफ प्रशाला संघाने पिंपरी-चिंचवड विभागातून जिल्हा परिषदेच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळविला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.