जम्मू-काश्‍मीरला जाण्याची आझाद यांना परवानगी

नवी दिल्ली -सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना जम्मू-काश्‍मीरला जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे आझाद त्या राज्यातील श्रीनगर, जम्मू, बारामुल्ला आणि अनंतनाग या चार जिल्ह्यांमध्ये जाऊन तेथील जनतेची भेट घेऊ शकणार आहेत.

जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या आझाद यांनी याआधी तीनवेळा त्या राज्याला भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिन्हीवेळा त्यांना विमानतळावरूनच माघारी पाठवण्यात आले. त्यामुळे जम्मू-काश्‍मीरमधील सामाजिक स्थितीची पाहणी करण्यासाठी तिथे जाण्याची परवानगी मिळावी यासाठी आझाद यांनी न्यायालयात धाव घेतली.

त्यानंतर न्यायालयाने त्यांना जम्मू-काश्‍मीरला जाण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. मात्र, राजकीय सभा घेण्यास आझाद यांना मनाई करण्यात आली आहे.

माकप नेते तारिगामीही दिल्लीतून परतू शकणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्वाळ्यामुळे माकप नेते मोहम्मद युसूफ तारिगामी त्यांच्या राज्यात (जम्मू-काश्‍मीर) परतू शकणार आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे आजारी तारिगामी यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता एम्सच्या डॉक्‍टरांनी रूग्णालयातून जाण्याची परवानगी दिल्यास तारिगामी यांना घरी परतण्यासाठी आमच्या संमतीची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.