जम्मू – कॉंग्रेसला रामराम ठोकणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी त्यांच्या नव्या राजकीय पक्षाचे नाव जाहीर केले. डेमोक्रॅटिक आझाद पार्टी (डीएपी) या नावाने तो पक्ष ओळखला जाईल.
आझाद यांनी महिनाभरापूर्वी तब्बल पाच दशकांपासून असलेली कॉंग्रेसची साथ सोडली. ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा प्रारंभी होती. मात्र, त्यांनी नवा पक्ष स्थापण्याची घोषणा केली. त्यानंतर आज येथील पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाचे नाव जाहीर केले. लोकशाही, अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्यावर पक्षाचे नाव आधारलेले आहे.
महात्मा गांधींच्या तत्वांवर आधारित विचारसरणीचा अवलंब डीएपी करेल. आमची इतर कुठल्याही राजकीय पक्षाशी स्पर्धा नाही. जम्मू-काश्मीरमधील शांतता आणि सुरळितता मजबूत करण्यावर पक्ष भर देईल. जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या मागणीला निवडणूक मुद्दा बनवणार नसल्याचेही आझाद यांनी स्पष्ट केले. रस्ते, पाणी, महागाई असे अनेक मुद्दे निवडणुकीसाठी आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
जम्मू-काश्मीरमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. स्वतंत्र चूल मांडून ती निवडणूक लढवण्यासाठी आझाद सज्ज झाले आहेत. त्यांना समर्थन असणाऱ्या दोन डझनहून अधिक नेत्यांनी याआधीच कॉंग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कॉंग्रेस दुभंगल्याचे चित्र आहे. मात्र, प्रदेश कॉंग्रेसने तूर्त तरी आझाद यांच्या नव्या पक्षाला फारसे राजकीय महत्व न देण्याची रणनीती अवलंबली आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष विकार रसूल वानी यांच्या प्रतिक्रियेतून ते सूचित झाले. आझाद यांचा पक्ष म्हणजे पक्षबदलूंचा समूह आहे. कॉंग्रेसने पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. आम्ही नव्या चेहऱ्यांना पुढे आणू. ते पक्ष सोडून गेलेल्यांच्या पराभवाची निश्चिती करतील, असे वानी यांनी म्हटले.