मोदींचे कौतुक केल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळला पक्षाच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पुतळा

श्रीनगर – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे कधी काळी पक्षश्रेष्ठींच्या विशेष मर्जीतले नेते होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विशेषत: 23 बड्या नेत्यांनी पक्ष नेतृत्वावरच तोफ डागणारे पत्र पाठवल्यानंतर या नेत्यांचे ग्रह फिरले असून आता त्यांच्यावर आपल्याच कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करण्याची वेळ आली आहे.

लेटर बॉम्ब पाठवणाऱ्या नेत्यांना आता जी 23 ही नवी ओळख कॉंग्रेस पक्षात मिळाली आहे. या नेत्यांची गेल्या आठवड्यात काश्‍मीरमध्ये बैठक झाली. त्यात विशेष म्हणजे यावेळी या सगळ्यांनी भगवी पगडी घातली होती. आझाद यांची राज्यसभेची मुदत नुकतीच संपली आहे. त्यांना निवृत्त करण्याच्या निर्णयावर कॉंग्रेस नेत्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

महत्वाचे म्हणजे खुद्द आझाद यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. मोदी यांनी आपला भूतकाळ कधीच लपवून ठेवला नाही. त्यांनी चहा विकला, भांडी घासली व हे सगळे जाहीरपणे सांगितले अशा शब्दांत आझाद यांनी त्यांची स्तुती केली होती. मात्र कॉंग्रेसजनांना हा प्रकार मानवला नसल्याचे दिसते आहे.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केवळ आझाद यांचाच नव्हे, तर जी 23 मधील अन्य नेत्यांच्या पुतळ्यांचेही दहन केले. ज्या नेत्याला कॉंग्रेसने आयुष्यभर सगळे दिले तोच नेता पक्षावर टीका करतोय. इतकेच नाही, तर ज्यांनी काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले, त्या मोदींची तारीफ करतो आहे, हे आम्हाला कधी मान्य होणार नाही. पक्षाने त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी आझाद व अन्य नेत्यांच्या विरोधात निदर्शने करणारे कॉंग्रेस कार्यकर्ते शाहनवाज हुसेन यांनी केली.

दरम्यान, आझाद, कपिल सिब्बल, भूपिंदर हुडा, राज बब्बर आदी नेते जम्मूत झालेल्या या जी 23 नेत्यांच्या बैठकीला उपस्थित होते. अगोदर शशी थरूर त्यांच्यासोबत होते. मात्र ते पुन्हा हायकमांडकडे झुकल्याच्या बातम्या आहेत. अन्य नेतेही श्रेष्ठींच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातो आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.