न्हावरे(प्रतिनिधी) :- न्हावरे (ता.शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२ साठी सन २०२०-२०२१ चे ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे.अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष,आमदार अशोक पवार यांनी प्रभातशी बोलताना दिली.
को – २६५ ऊस प्रजातीसाठी आडसाली ऊस लागवडीचा कालावधी १५ जून ते ३१ ऑगस्ट २०२० आहे. तर को – ८६०३२ साठी आडसाली लागवड कालावधी १ जूलै ते ३१ ऑगस्ट २०२० आहे. को -८६०३२, व्हीएसआय – ०८००५, व्हीएसआय- ९८०५, को एम – ०२६५, एमएस – १०००१, कोसी – ६७१ या ऊस प्रजातींसाठी पूर्व हंगामी लागवड कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२० असणार आहे.
त्याचप्रमाणे सुरू ऊस लागवडीचा कालावधी १ डिसेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ असा आहे. या कालावधीत को – ८६०३२, कोसी – ६७१, व्हीएसआय – ०८००५, व्हीएसआय – ९८०५, व्हीएसआय – ४३४ व एमएस – १०००१ या ऊस प्रजातींची लागवड शेतकरी करू शकतात. ऊस लागवड करताना उसाचे बेणे नऊ ते दहा महिने कालावधीचे वापरावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरून लागवडीच्या दरम्यान दोन टिपऱ्या मधील अंतर नऊ इंच ठेवावे. यांत्रिक पद्धतीने ऊस तोडणी करण्यात येणार असल्यामुळे ऊस लागवड करताना पाच फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेऊन ऊस लागवड करावी. ठिबक सिंचनाने लागवड केलेल्या उसाला आगामी काळात ऊस तोडणीसाठी प्राधान्याने ऊस तोड देण्यात येणार आहे. तसेच ऊस तोडणी कार्यक्रम राबवताना उसाची रिकव्हरी तपासून जादा साखर उतारा असणाऱ्या उसाला ऊस तोड देण्यात येईल.असे कारखाना प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांना उसाची लागवड रोपांपासून करावयाची आहे.अशा शेतकऱ्यांनी ऊस लागवड धोरणाच्या पुढे तीस दिवसानंतर शेतात ऊस रोपांची लागवड करावी व त्याच दिवशी ऊसलागवड नोंद करावी. त्याचप्रमाणे कारखान्याने गाळप केलेल्या सर्व ऊसाचा खोडवा शेतकऱ्यांनी ठेवावा व ऊस उत्पादकांनी माती परीक्षण करून घेऊन शिफारस केल्यानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासदांना प्रेसमडवर जैविक प्रक्रिया केलेले उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत योग्य दरात दिले जाईल. तसेच कारखान्याच्या वडगाव रासाई येथील कृषी सेवा केंद्रातून ऊस उत्पादक सभासदांना उपलब्धतेनुसार रासायनिक खते व कारखाना साईटवरून ताग,धैंचा बियाणे, तणनाशके, व्हीएसआय निर्मित मल्टीमायक्रो व मल्टीमॅक्रो न्यूट्रीयंट, अॅसीटोबॅक्टर,साॅईल हेल्थ,पलॅट हेल्थ व पाचट कुजविणारे जिवाणू तसेच हूमणी किड नाशकांचा पुरवठा योग्य दरात केला जाईल. ऊस उत्पादक सभासदांना कारखाना रोपवाटिकेतून फळझाडे, फूलझाडे व शोभीवंत झाडे योग्य दरात पुरविण्यात येतील.
धोरणबाह्य ऊसाची नोंद कुठल्याही सबबीवर घेतली जाणार नाही. तसेच वरीलप्रमाणे ऊसलागवड नियोजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवून कारखान्यास सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष आमदार पवार यांनी केले