गाझियाबाद, (उत्तर प्रदेश) – गाझियाबादमध्ये रविवारी झालेल्या स्फोट प्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी आज अटक केली. नितीन चौधरी असे त्याचे नाव असून या स्फोटप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर त्याला शोधून काढण्यात आले आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलानिधी नाइथानी यांनी सांगितले. मेणबत्त्यांच्या बेकायदेशीर कारखान्यामध्ये झालेल्या या स्फोटामध्ये 8 जण मरण पावले होते.
या स्फोटानंतर फॅक्टरीला आगदेखील लागली होती. ही फॅक्टरी गाझियाबादेतील मोदी नगरमधील बाखरवा गावात आहे. वाढदिवसाच्या वेळी केकवर लावल्या जाणाऱ्या मेणबत्त्या या फॅक्टरीमध्ये तयार केल्या जात होत्या. त्यासाठी लागणाऱ्या ज्वालाग्रही पदार्थांचा मोठा साठा या फॅक्टरीमध्ये करण्यात आला होता. फॅक्टरीत तयार केलेल्या शोभेच्या मेणबत्त्यांचे पॅकिंग केले जात असताना हा स्फोट झाला, असे चौधरीने चौकशीच्यावेळी सांगितले आहे.