लोणी काळभोर – हवेली तालुक्यातील सर्व गुटखा विक्रेत्यांना मालाचा पुरवठा करणारा गुटखाकिंग म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या सुरेश मिलापचंद ओसवाल (जैन) याच्यावर पुन्हा एकदा कारवाई करीत हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी व लोणी काळभोर पोलीसांनी तब्बल 5 लाख 35 हजार 20 रुपये किंमतीचा सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त केला. यापूर्वीही ओसवालवर 2017मध्ये दि. 27 जुलै आणि दि. 18 सप्टेंबरला मोठी कारवाई पोलिसांनी केली होती, अशी माहिती हवेलीच्या उपविभागीय पोलीस आधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांनी दिली.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी गणपत पांडुरंग कोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश मिलापचंद ओसवाल (जैन) (वय 41, रा. लोणी काळभोर) यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 31 जुलै) करण्यात आली. सुरेश ओसवाल हा गुटख्याचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. यानुसार रावसाहेब रानगर, मेहबूब शेख, विकास लगस, अभी टिळेकर, ज्योती सोनवणे, लक्ष्मण पानसरे, शेंडगकर तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, पोलीस हवालदार शशिकांत पवार, शंकर साळुंखे यांना समवेत घेऊन ओसवाल यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी विविध प्रकारचे व कंपन्यांचा एकूण 5 लाख 35 हजार 20 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. पोलीसांनी हा मुद्देमाल जप्त करून अन्न व औषध प्रशासनाचे ताब्यात दिला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवाजी ननवरे करीत आहेत.
ओसवालवर दोनवेळा कारवाई…
गुटखाकिंग सुरेश ओसवाल याच्यावर यापुर्वी दि. 17 जुलै 2017 मध्ये शिंदवणे घाटांत कारवाई करीत त्याने कर्नाटक राज्यातून कारमधून आणलेला आठ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता तर दि. 28 सप्टेंबर 2017 मध्ये त्याने नायगाव येथील मार्गवस्तीतील घरात ठेवलेला 3 लाख 36 हजार रुपये किमतीचा गुटखा व पानमसाला जप्त केला होता. ओसवाल काही महिने येरवडा तुरुंगातही जावून आला आहे. सध्या, तो जामिनावर सुटलेला आहे. तर, तीन खटले शिवाजी नगर न्यायालयात प्रलंबित आहेत.