पंतप्रधान दौऱ्याच्या नावे विकास कामे करण्याचा घाट

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांचा आरोप

निवडणूक आयोगाकडे दाद मागणार

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या नावाखाली विविध भागांमध्ये विकासाची कामे करून तिथल्या मतदारांना आकृष्ट करण्याचाच हा एक प्रकार आहे. जर अतिक्रमणे आहेत आणि अन्य समस्या आहेत, तर ती या आधी का नाही काढली? असा, सवालही तुपे यांनी विचारला आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांना हाताशी धरून, त्यांच्यावर दबाव आणून, आचारसंहितेचे उल्लंघन आहे. त्यामुळे या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचा इशारा तुपे यांनी दिला आहे.

पुणे – पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या नावाखाली विकास कामे करून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी शनिवारी केला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला नुकतेच एक पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच “16 एप्रिल रोजी होणाऱ्या पंतप्रधानांच्या सभेसाठी तयारी करावी, त्याची गोपनीयता बाळगावी. जास्त चर्चा होऊ देऊ नये,’ तसेच प्रसिद्धी माध्यमांना सुगावा लागू देऊ नये, असेही बजावण्यात आल्याचा आरोप तुपे यांनी केला आहे.

“पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षा महत्त्वाची हे आम्हांला समजू शकते; परंतु गळणाऱ्या पाइपलाइन, गटारे यांची कामे करावीत, अतिक्रमणे काढावीत. रस्त्याला पडलेले खड्डे बुजवावेत असे कामाचे स्वरूप या पत्रामध्ये आहे.
पुणेकर रोज खड्ड्यातून गेले तरी चालतील, त्यांना त्रास झाला तरी चालेल परंतु पंतप्रधानांना पुणे चकाचक वाटले पाहिजे, यासाठी सत्ताधारी भाजप जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनावर दबाव आणत आहे,’ असा आरोपही तुपे यांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.