महाराष्ट्राच्या अनन्या, दिया यांची चमकदार कामगिरी

भारताची एकूण 12 पदकांची कमाई

अक्रा (घाना) : भारताच्या युवा टेबल टेनिस खेळाडूंनी घाना ज्युनिअर आणि कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सात सुवर्णपदक, तीन रौप्यपदक आणि दोन कांस्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्रच्या अनन्या चांदे आणि दिया चितळे यांनी चमकदार कामगिरी करत एकूण नऊ पदकांची (सात सुवर्णपदक, एक रौप्यपदक, एक कांस्यपदक) कमाई केली. दियाने मुलींच्या ज्युनिअर एकेरी गटात आपले पहिले सुवर्णपदक मिळवले. यानंतर तिने मॉरिशसच्या नंदेश्वरी जलीम सोबत ज्युनिअर दुहेरी आणि सांघिक गटात आणखीन दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

अनन्या चांदेने दियापेक्षा सरस कामगिरी करत चार सुवर्णपदकांची कमाई केली. तिने मुलींच्या मिनी मिडेट गटात सुवर्णपदक मिळवित दमदार सुरुवात केली. मुलींच्या कॅडेट एकेरी, दुहेरी आणि सांघिक गटात देखील तिने सुवर्णपदक मिळवले. अनन्याने ज्युनिअर दुहेरीत (इंग्लंडच्या रुबी चॅन सह) रौप्यपदक आणि मुलींच्या ज्युनिअर एकेरीत कांस्यपदकाची कमाई केली.

मैनक निस्ताला आणि अर्णव मनोज कर्णावर यांनी देखील भारताच्या पदकांमध्ये भर घातली. दोघांनीही मिळून कॅडेट मुलांच्या दुहेरीत व सांघिक गटात चमक दाखवत दोन रौप्यपदकाची कमाई केली. त्यांना नायजेरियाच्या तैवो माती आणि जमिऊ अयानवाले जोडीकडून पराभूत व्हावे लागले. मुलांच्या कॅडेट एकेरी गटात अर्णवने कांस्यपदक मिळवले. त्याला उपांत्यफेरीत नायजेरियाच्या जमिऊकडून 2-3 असे पराभूत व्हावे लागले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.