दिव्यांगांना ‘गेटवेल’चा आधार

मंचर येथे जयपूर फूट वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंचर – येथील गेटवेल हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत जयपूर फूट वाटप शिबिराला दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 78 दिव्यांगांची मोजमापे घेण्यात आली असून त्यांना सोमवारी (दि. 25) इनलॅक्‍स हॉस्पिटल पुणे येथे कृत्रिम अवयव, काठ्या, मौजे, वॉकर, कॅलिपर व कुबड्‌यांचे मोफत वाटप केले जाणार आहे.

साधू वासवानी मिशन पुणे, ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था मंचर व गेटवेल हॉस्पिटल मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाना मोफत जयपूर फूट वाटप शिबिराचे उद्‌घाटन राज्य गृह खात्याचे उपसचिव कैलासराव गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, डॉ. मोहन साळी, सलील जैन, गोविंद खिलारी, संतोष बाणखेले, साधू वासवानी मिशनचे प्रकल्प अधिकारी मिलिंद जाधव यांच्यासह दिव्यांग आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

कैलास गायकवाड यांनी दिव्यांगासाठी घेतलेल्या शिबिराचे कौतुक केले. ते म्हणाले हात पाय नसलेले दिव्यांग जीवनात दररोजच संघर्षाची लढाई करत आहेत. समाजातील सर्व घटकांनी माणुसकीच्या नात्याने पुढे येऊन दिव्यांगांचे जीवन आनंदी होण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

गजानन टोम्पे म्हणाले, अपघात पोलिओमुळे अनेकांना हातपाय गमवावे लागले आहेत. अशा दिव्यांगाना समाजाकडून प्रेम, प्रतिष्ठा व प्रोत्साहन मिळाले पाहिजे. साधू वासवानी मिशनचे सुशील ढगे म्हणाले आतापर्यंत 19 हजार 700 लाभार्थींना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप केले आहे. डॉ. भूषण साळी म्हणाले कृत्रिम अवयव वापरण्यास मिळाल्यानंतर दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आमचा आनंद द्विगुणित होतो.

दरवर्षी दिव्यांगासाठी शिबीर घेण्याचे नियोजन केले जाईल. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ. मोहन साळी, ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील, ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या कार्यकारी संचालिका गार्गी वळसे पाटील, उद्योजक अजय घुले यांची भाषणे झाली. राज्य अपंग हित विकास व पुर्नवसन संघाचे अध्यक्ष दीपक ढोबळे, समीर टाव्हरे, ज्ञानेश्‍वर शिंदे, सुनील दरेकर, मनोहर थिटे, डॉ. दीप्ती साळी, नंदिनी साळी, मारुती बबन कुऱ्हाडे यांनी शिबिराची
व्यवस्था पाहिली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.