पाणी मिळवणे ही एकाच गटाची मक्‍तेदारी नाही

आ. स्नेहलता कोल्हे : गोदावरी डावा तट कालवा रुंदीकरणाच्या कामास प्रारंभ

कोपरगाव  – योग्य वेळी जागे व्हा. आज निसर्ग कोपला आहे, पाणी मिळवणं ही काही एकाच गटाची मक्तेदारी नाही. वेळ निघून गेल्यावर पदरात काहीच पडणार नाही. लोकसहभागाची चळवळ सर्वांची आहे. तेंव्हा किमान पाण्यासाठी तरी सर्वपक्षीय नेत्यांनी एक व्हावे, असे आवाहन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

तालुक्‍यातील पढेगाव पाटबंधारे विभागातील करंजी येथे गोदावरी डाव्या तट कालव्याचे शासन, सहकार महर्षी कोल्हे कारखाना व लोकसहभागाच्या चळवळीतून रुंदीकरण व खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ माजी मंत्री शंकरराव कोल्हे व लाभार्थी शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आ. कोल्हे बोलत होत्या.

गोदावरी डावा तट कालव्याचे माजी उपअभियंता भास्कर सुरळे प्रास्ताविकात म्हणाले, करंजी पढेगाव परिसरात कालव्याची वहनक्षमता अवघी 90 क्‍युसेक्‍स झाली आहे. त्यात वाढ करून ती 150 क्‍युसेक्‍स पर्यंत करावयाची आहे. पाणी वाढले तर शेतकऱ्यांची भरणे मुदतीत पूर्ण होतील. शासनाचे पाठबळ यासाठी मिळत आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी साथ द्यावी. प्रारंभी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक भास्करराव भिंगारे, सरपंच छबुराव आहेर, उपसरपंच रवींद्र आगवण, माजी उपसभापती नवनाथ आगवण यांनी स्वागत केले.

यावेळी लोकनेते स्व. आर. एम. पाटील भिंगारे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू गणेश भिंगारे यांनी पाच हजार एक, तर ओगदीचे आण्णासाहेब कोल्हे यांनी एक हजार रुपये, तर व्यापारी नारायण अग्रवाल यांनी पाच हजारांची रक्कम कालवा रुंदीकरणाच्या कामासाठी दिले. याप्रसंगी संचालक फकिरराव बोरनारे, त्र्यंबकराव परजणे, ज्ञानेश्‍वर परजणे, अजय भिंगारे, गणेश भिंगारे, बाळासाहेब भिंगारे, माजी सरपंच चंद्रशेखर देशमुख, फकिरराव डोखे, संपतराव भारूड, बापूराव बारहाते, अनिल डोखे, रामभाऊ कासार, उत्तमराव चरमळ, पढेगावचे सरपंच प्रकाश शिंदे, साहेबराव रोहोम, विकास शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. संगमनेर यांत्रिकी उपविभागाचे उपअभियंता सी. बी. भाबड, शाखा अभियंता कैलास राऊत, वीरेंद्र पाटील आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. माजी मंत्री कोल्हे म्हणाले, कालव्यांची दुरवस्था झाली असून, त्यांच्या रुंदीकरण व खोलीकरणाच्या कामासाठी सर्वांनी गटतट, पक्ष, आपसातील मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवून पाण्यासाठी एक व्हावे. तुटीच्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाणी मिळावे, यासाठी सातत्याने पुढाकार घेऊनच काम केले आहे.शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध व्हावे, यासाठी आजही या वयात आपल्यापरींने काम सुरूच आहे.

आमदार कोल्हे म्हणाल्या, नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा प्रादेशिक वाद निर्माण न करता जायकवाडीला कमी पडणाऱ्या पाण्यासाठी वैतरणेचे पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या कामाला आपले सर्वोच्च प्राधान्य असून, केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला लढा सुरूच आहे. समाज हाच परिवार मानून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी आजवर काम केले आहे. तोच वरसा बिपीन कोल्हे व आपण चालवत आहोत. गोदावरी कालवे रुंदीकरण व खोलीकरणाच्या लोकसहभाग चळवळीत प्रत्येक शेतकऱ्याने आपला खारीचा वाटा उचलावा व याकामासाठी सहकार्य करावे. सूत्रसंचालन देविदास भिंगारे यांनी करून आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)