भरवसा ठेवा अन् जगा…

दिसं जातील,
दिसं येतील…
भोग सरलं,
सुख येईल

– कल्याणी फडके

पुणे – लॉकडाऊन काळात अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. नोकऱ्यांवर गदा आल्याने भविष्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. या परिस्थितीला कंटाळून आत्महत्येच्या घटना घडत आहेत. याचे प्रमुख कारण नैराश्‍य असल्याचे समोर येत आहे. परंतु, आत्महत्या हा पर्याय नाही. नागरिकांना आलेले नैराश्‍य दूर करता येते. सध्याच्या स्थितीत आपण निभावून नेऊ, असा विश्‍वास आवश्‍यक आहे. सकारात्मक मानसिकता असणे गरजेची असल्याचे मत समुपदेशकांनी व्यक्‍त केले.

लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना मागील महिन्यांचे पगार मिळालेले नाहीत. त्यात कर्जाचा बोजा, हळूहळू सुरू होणाऱ्या मुलांच्या शाळांचे खर्च, ई-लर्निंगसाठी मोबाइल, टॅब, लॅपटॉप आदीचा खर्च, आजारपणाचा खर्च, वाढता घरखर्च आदींची आर्थिक चिंता अनेक कुटुंबांना सतावत आहे. याशिवाय, मागील अडीच महिन्यांपासून घरात असल्याने कौटुंबिक वाद होत आहे. यामुळे चिडचिड आणि कौटुंबिक तणाव वाढत आहेत. याशिवाय, या परिस्थितीतून कसे निभावून नेऊ, असा प्रश्‍नदेखील भेडसावत आहे. आर्थिक संकट आणि भविष्याचा विचार यातूनच अनेकांनी आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांकडून देखील व्यक्‍त करण्यात येत आहे.

मात्र, आत्महत्येचा पर्याय स्वीकारणे योग्य नसून, या स्थितीतून कसे बाहेर पडता येईल, याचा विचार केला पाहिजे. करोना पार्श्‍वभूमीवर व्यक्‍ती आरोग्य जपत आहेत. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य जपणे आवश्‍यक असल्याचे महत्त्व सध्या पटणेदेखील गरजेचे आहे. बदलती जीवनशैली, अपयश, अती अपेक्षा, अती भीती आदी कारणांमुळे प्रामुख्याने नैराश्‍य ओढावत आहे. प्रत्येक व्यक्‍तीमध्ये भावना असल्याने सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही मानसिकता असतात, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे, असे समुपदेशक सांगतात.

अशीही करता येऊ शकते मात
– स्वत:चा शोध घेतला पाहिजे
– नातेवाईक, मित्रमैत्रिणींशी संवाद साधणे आवश्‍यक आहे
– कलागुण जोपासले पाहिजेत

पुण्यासारख्या ठिकाणी मानसिक आजार असणे हा कलंक उरलेला नाही, असा भ्रम होता. या ठिकाणी अनेक मानसोपचार तज्ज्ञ काम करतात, “सुसाईड प्रिव्हेंशन हेल्पलाइन आदी अनेक काळापासून सुरू असूनदेखील या प्रकारच्या घटना घडत आहेत. पण आत्महत्या अचानक करत नाहीत. मन खोल गर्तेत जाण्याआधी खूप आधीपासून सुरुवात झालेली असते. ही लक्षणे स्वत:ला आधी लक्षात आल्यास मदत मागितली जाऊ शकते. इतरांना दिसली तर मदत दिली जाऊ शकते. आयुष्यात दु:ख असणारच, समस्या येणारच. पण त्यावरचे उत्तर धीर धरल्यास सापडू शकेल. मरून जाणे त्यावरचे उत्तर नाही. जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही असणारच याचे भान मुलांना वाढवताना देणे आवश्‍यक आहे. तोच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे.
– डॉ. नीलिमा ओसवाल, वैद्यकीय समुपदेशक

Leave A Reply

Your email address will not be published.