लागले कामाला! रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी दरडी हटवण्याचे काम हाती

पुणे – घाटात दरड कोसळून रेल्वे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार पावसाळ्यात घडतात. ते टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. घाटातील धोकादायक दरडी हटवण्याचे काम हाती घेतले असून, त्यापैकी सुमारे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे.

पावसाळ्यात रेल्वे मार्गावर दरड कोसळणे, पुलाखालील भराव वाहून जाणे आदी घटना घडतात. परिणामी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते. अनेकदा गाड्या रद्द कराव्या लागतात. या घटना टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच मध्य रेल्वेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

मध्य रेल्वेंतर्गत दक्षिण पूर्व घाट हा सुमारे 28 किलोमीटरचा असून, यामध्ये सुमारे 58 बोगदे आहेत. तर, उत्तर पूर्व घाट सुमारे 14 किलोमीटरचा असून यात सुमारे 18 बोगदे आहेत. घाटांत प्रामुख्याने सैल झालेल्या दगडांचे परीक्षण करण्यात येते. त्यानंतर त्या दरडी पाडून, विशेष गाडीद्वारे वाहून नेण्यात येतात. मागील डिसेंबरपासून कामाचे अंदाजपत्रक, निविदा आदी प्रक्रिया सुरू झाली होती. तर प्रत्यक्ष फिल्डवर काम मार्चच्या मध्यापासून सुरू झाले.

घाटातील दरडींच्या पाहणीचे काम पूर्ण झाले आहे. तर, दरडी पाडण्याचे सुमारे 40 टक्के काम पूर्ण झाले असून, मेअखेरपर्यंत ही कामे पूर्ण होणार आहेत. याशिवाय घाटांतील अन्य कामेदेखील हाती घेतली आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अशी असते विशेष गाडी

वॅगन आणि दोन डिझेल इंजिनचा समावेश असणाऱ्या बोल्डर विशेष गाडीचा वापर घाट सेक्शनमध्ये करण्यात येतो. यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. मध्य रेल्वेच्या दोन घाटांमध्ये या गाड्या सध्या कार्यरत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.