उपमुख्यमंत्री अजित पवार : प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा घेतला आढावा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येणारा आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र आणि पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच केल्या.
पुण्यात झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. त्या प्रसंगी पवार बोलत होते. प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक 12 येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. या गृहप्रकल्पात 4 हजार 883 सदनिका उभारल्या जात आहे. गृहप्रकल्पाचे सध्या काय काम सुरू आहे? कामाची प्रगती काय? याबाबतची सविस्तर माहिती पवार यांनी जाणून घेतली.
मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रदर्शन केंद्रातंर्गत 20 हेक्टर क्षेत्रात खुल्या प्रदर्शन केंद्राची उभारणी केली जात आहे. त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजित आहे. प्रकल्पाचे काम आत्तापर्यंत किती पूर्ण झाले आहे? कधीपर्यंत काम पूर्ण होईल? याबाबतची माहिती पवार यांनी विचारली. तसेच, दोन्ही प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी, अशा सूचना केल्या. प्राधिकरणाकडून आणखी नव्याने काही प्रकल्प राबविता येतील का, याचेही नियोजन करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. प्राधिकरण प्रशासनाच्या वतीने बन्सी गवळी यांनी प्रकल्पांची सद्य:स्थिती आणि भविष्यकालीन नियोजन याबाबत माहिती दिली.
पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पाचे लवकरच रेरा अंतर्गत नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मोशीतील खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या देखभालीसाठी खासगी संस्थेकडून निविदा मागविल्या जाणार आहेत.
– बन्सी गवळी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण.