पीएमसी बॅंक खातेधारकांच्या प्रश्नांवर लवकर तोडगा काढा!

– कॉंग्रेस शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
– भीमा कोरेगाव आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याची मागणी

मुंबई :  पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी) बॅंकेच्या खातेधारकांच्या प्रश्नांवर व समस्यांवर लवकरात लवकरात तोडगा काढण्यात यावा. तसेच भीमा कोरेगाव आंदोलन प्रकरणात दलित आंदोलनकर्त्यांवरील, त्याचप्रमाणे कॉंग्रेस तर्फे ठिकठिकाणी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवरील केसेस मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळामध्ये एकनाथ गायकवाड यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार वर्षा गायकवाड, मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार चरणसिंग सप्रा, माजी आमदार भाई जगताप, मुंबई कॉंग्रेसचे समन्वयक राजेश भाई ठक्कर आणि मुंबई कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष संदीप शुक्‍ला यांचा समावेश होता.

याबद्दल अधिक माहिती देताना एकनाथ गायकवाड म्हणाले, पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी) बॅंकेचे 16 लाख खातेधारक मागील 80 दिवसांपासून त्यांचे स्वतःचे बॅंकेत जमा असलेले पैसे परत मिळावेत यासाठी बॅंकेचे खेटे घालत आहेत, आंदोलन करत आहेत. हा मुद्दा संसदेत सुद्धा उपस्थित झालेला आहे. तरी सुद्धा या खातेधारकांना अजून न्याय मिळाला नाही. 18 खातेधारकांचा या दरम्यान मृत्यू झाला आहे. या खातेधारकांना त्यांची जमा असलेली रक्कम परत मिळायला हवी.

त्यासाठी सरकारने लवकरात रिव्हायवल पॅकेज जाहीर करण्याची किंवा पीएमसी बॅंकेचे दुसऱ्या सशक्त बॅंकेमध्ये विलीनीकरण करण्याची आवश्‍यकता आहे. आज आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे. त्यात आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी प्रकरणांत लक्ष घालावे व त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा.

2018 साली भीमा कोरेगाव येथे जी घटना झाली होते. त्याविरोधात तेथे मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्या दलित आंदोलनकर्त्यांवर अजूनही केसेस सुरु आहेत, ते अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनकर्त्यावरील लवकरात लवकर केसेस मागे घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

मुंबई कॉंग्रेसतर्फे मुंबईत ठिकठिकाणी मुंबईकरांच्या प्रश्नांवर, त्यांच्या समस्यांवर आंदोलने करण्यात येतात. त्यात शेकोडो आंदोलनकर्ते सहभागी होतात. त्यांना अटक केली जाते. त्यांच्यावर केसेस दाखल केल्या जातात. ही आंदोलने मुंबईकरांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असतात आणि म्हणूनच आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये, त्यांना विनंती केली आहे की या आंदोलनकर्त्यांवरील केसेस मागे घेण्यात याव्यात, अशी माहिती एकनाथ गायकवाड यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.