मुंबई – राज्यभरात मान्सूनने जुन महिन्यात ओढ दिल्यानंतर मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने जुलैमध्ये पहिल्याच दिवशी दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पावसाचे पाणी साचले आहे. अशातच पुढील पाच दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच, पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी मुंबईतील नेहमीच्या ठिकाणी पाणी साचले होते. हिंदमाता चौक, अंधेरी, गांधी मार्केट आदी भागात पाणी साचले असून, रात्री उशिरा या पाण्याचा निचरा झाला. परंतु, आज पुन्हा पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गरज असल्यास घराबाहेर पडा, असे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोकणात मुसळधार पाऊस झाला. सर्वाधिक मुंबईत 126 मि.मी., तर रत्नागिरीत 83 मि.मी. पाऊस झाला. सांताक्रूझ, अलिबाग येथे 53 मि.मी. तर डहाणूत 21 मि.मी. पाऊस झाला.
विदर्भातील अमरावतीत 15, वर्धा 14, बुलडाणा 6, नागपूर 4, ब्रह्मपुरी, चंद्रपूर 1 तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये 9, महाबळेश्वर 8, सांगली 5 मि.मी. पाऊस पडला. कोकण वगळता उर्वरित भागात येत्या चार दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईसह पालघर, ठाणे, कोल्हापूरपर्यंत पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.