कोइम्बतूर – दक्षिण विभागाविरुद्धच्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वातील कठोरपणाही दाखवून दिला. दक्षिण विभागाचा फलंदाज रवी तेजा याला उद्देषून टोमणे मारणारा व स्लेजिंग करणारा पश्चिम विभागाचा खेळाडू यशस्वी जयस्वाल याला पंचांनी ताकित देण्यापूर्वीच रहाणेने त्याला मैदानाबाहेर जाण्यास फर्मावले.
आपल्याच संघातील खेळाडूने केलेले गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही हेच रहाणेने आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्याबद्दल मैदानावरील पंच, तिसरे पंच सामनाधिकारी तसेच समालोचक व टीकाकार यांनी रहाणेच्या कृतीचे स्वागत केले.