गारवा देणारे लँडस्केपिंग

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पर्याय कोणतेही असो, उद्देश मात्र एकच असतो आणि तो म्हणजे घरात गारवा निर्माण करण्याचा. काही उपाय खरोखरीच आपल्या आवाक्‍यातले असून घरात थंडावा निर्माण करण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो. लॅण्डस्केपिंग हा त्यापैकीच एक सोपा पर्याय…

उन्हाळ्यात घरात गारवा निर्माण करण्यासाठी अनेकविध प्रकारे प्रयत्न केले जातात. हे प्रयत्न प्रत्येकाची आवड अन्‌ बजेटनुसार वेगवेगळे असू शकते. यापैकी काही जणांना लॅण्डस्केपिंगची आवड असते. “लॅण्डस्केपिंग”च्या माध्यमातूनही घरात एकप्रकारचे थंड वातावरण निर्माण करता येऊ शकते. लॅण्डस्केपिंग”च्या माध्यमातून घर कलात्मक बनविणार असाल तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे “लॅण्डस्केपिंग” शक्‍यतो घराच्या दक्षिण किंवा पश्‍चिम भागात करा. म्हणजे झाडांच्या सावलीने घरातही गारवा निर्माण होतो. तिथे दगड किंवा सिमेंटचे “लॅण्डस्केपिंग” करू नका. कारण त्यात वापरले जाणारे शोभेचे दगड, काचा यामुळे उष्णता अधिक निर्माण करतात.

“लॅण्डस्केपिंग” करताना आणखी एका पर्यायाचा विचार करता येऊ शकतो. घरासमोर मोकळी जागा असेल आणि त्या दिशेने ऊन येत असेल तर अशा दिशेला थोड्या मोठ्या उंचीची झाडं लावा. म्हणजे त्या झाडांची सावली मिळून तिथलं वातावरण थंड राहील. बंगलो किंवा रोहाऊस असल्यास हिरव्यागार झाडांचा पर्याय तर नेहमीच फायदेशीर ठरतो. परंतु एखाद्या कुटुंबाचा फ्लॅट असेल तर त्यामध्ये पाण्याचे झरे असणारे व आजूबाजूला झाडांनी सुसज्ज असे “लॅण्डस्केपिंग”करता येणे शक्‍य आहे.

अशा प्रकारच्या “लॅण्डस्केपिंग”चे दोन फायदे असतात. ते दिसायलाही आकर्षक दिसतात आणि त्यातून आपला मूळ उद्देशही साध्य होतो. उन्हाळ्यात हे घरगुती आणि बाह्य उपाय करून पाहा. “लॅण्डस्केपिंग”च्या या पर्यायांचा वापर केल्यास उन्हाळ्यात घरात नक्कीच थंडावा निर्माण होईल. यंदा हा प्रयोग करून बघाच.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.