चंद्रकांत पाटील ः खडसे-पंकजांची समजूत काढण्याचा प्रयत्न
बीड : पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंच्या नाराजीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीनाथगडावर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. चुका माणसांकडून होतात. त्याचा राग पक्षावर कशाला काढता, अशा शब्दात पाटलांनी दोन्ही नाराज नेत्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या वेदना, खंत समजू शकतो. पक्ष त्याची दखल घेईल, असा शब्द पाटलांनी दिला. त्याचबरोबर मराठी शब्द जरा जपून वापरा, उद्या सगळं ठिक झाल्यावर आपल्याला अपराधी वाटायला नको, अशा शब्दात पाटील यांनी खडसे आणि पंकजांना समजावून सांगितले.
गोपीनाथगडावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी घरातले वाद घरातच मिटवले पाहिजे, असे वक्तव्य केले. कारण आपण घरातले वाद रस्त्यावर येऊ देत नाही. सोबतच व्यक्तीवर राग असू शकतो पक्षावर राग ठेवू नका, अशा शब्दात त्यांनी पंकजा मुंडेंना मनवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, परळीतील यशश्री बंगल्यावर पंकजा मुंडे यांच्याशी बंद दाराआड चर्चा झाली. चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि पंकजा मुंडे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली.
एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील म्हणाले, नाथाभाऊ तुम्ही जाण्याची किंवा स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा करु नका. पक्षाच्या चुका झाल्या नाहीत. चुका माणसांच्या झाल्यात. पक्षावर कशाला राग काढताय. उलट तुम्ही बोला की तू काल आला आहेस. आम्ही पक्षातच राहणार आहे. तू जायचे तर जा, असे तुम्ही आम्हाला म्हणा आणि पक्षात राहून संघर्ष करा, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.