#BelgiumVsGermany : आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट मालिकेत जर्मनीचा 3-0 ने मालिका विजय

ब्रसेल्स – विजयशंकर चिक्कान्याह याच्या नाबाद 70 धावांच्या खेळीच्या जोरावर जर्मनीने तिसऱ्या आणि अखेरच्या टी20 क्रिकेट सामन्यात बेल्जियम संघाचा 6 गडी राखून पराभव करत 3-0 ने मालिका आपल्या खिशात घातली आहे.

जर्मनी आणि बेल्जियम यांच्यातील तीन सामन्याच्या टी20 क्रिकेट मालिकेचा शेवट काल झाला. जर्मनी आणि बेल्जियम यांच्यातील ही पहिलीच टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका असून या मालिकेत जर्मनीने बेल्जियमविरूध्द 3 पैकी 3 सामने जिंकून मालिकेवर वर्चस्व गाजवले आहे.

काल बेल्जियममधील राॅयल ब्रसेल्स येथील क्रिकेट मैदानावर मालिकेतील तिसरा आणि अखेरचा क्रिकेट सामना पार पडला.
जर्मनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. बेल्जियमने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 133 धावा केल्या. बेल्जियम संघाकडून मुरीद एकरामीने सर्वाधिक 28 तर सैय्यद जमील आणि मामून लतीफने प्रत्येकी 24 धावा केल्या. जर्मनीकडून अब्दुल शकूर रहीमजीने 2 गडी बाद केले.

विजयासाठीचे 134 धावांचे आव्हान जर्मनीने 18 षटकांत 4 बाद 135 धावा करत पूर्ण केले. जर्मनीकडून विजयशंकर चिक्कान्याहने सर्वाधिक 70 ( 5 चौकार आणि 2 षटकार) धावा केल्या. त्याला या कामगिरीबदल सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. बेल्जियमकडून गोलंदाजीत आशिकुल्लाह सैद,राजा सकलैन अली आणि सैयद जकी उल हसन यांनी 1 गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.