नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. दरम्यान, त्यांच्यावरील या कारवाईचे पडसाद संपूर्ण देशात तर उमटले पण जागतिक स्तरावरून देखील याविषयी प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राहुल गांधीवरील कारवाईचे पडसाद सुरुवातीला अमेरिकेच्या संसदेत उमटले होते. त्यानंतर आता राहुल गांधींवरील कारवाईवरून जर्मनीने सूचक वक्तव्य केले आहे. तर जर्मनीच्या पाठिंब्यावर काँग्रेसकडून आभार मानल्यानंतर आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
राहुल गांधी यांना दोषी ठरवणाऱ्या निकालाची तसेच, त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या सर्व घटनेची आम्ही दखल घेतली आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयीन स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व या दोन्हींचे पालन होणे अपेक्षित होते, असे स्पष्ट मत जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केले आहे. तसेच लोकशाहीचे मूलतत्त्व पाळले गेले पाहिजे, असे म्हणत या संपूर्ण घडामोडींवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या पाठिंब्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी जर्मनीचे आभार मानले आहेत.
राहुल गांधींना पाठिंबा देणाऱ्या जर्मनीचे आभार मानून दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा काँग्रेससमोर प्रश्न निर्माण केले आहेत. दिग्विजय सिंह यांनी याबद्दल जर्मनीचे आभार मानले, ही संधी साधून भाजपने पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तर काँग्रेसने दिग्विजय यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवले.
दिग्विजय यांच्या ट्वीटमुळे भाजपच्या हाती कोलित मिळाले. भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत ‘देशाच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी परराष्ट्रांना आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद’, असे ट्वीट रीजिजूंनी केले. तर दुसरीकडे ‘देशाच्या लोकशाहीशी निगडित प्रश्न, राजकीय तसेच कायद्याशी संबंधित समस्या सोडवण्याची क्षमता राहुल गांधी आणि काँग्रेसकडे नसल्याने परराष्ट्रांच्या हस्तक्षेपाची मागणी केली जात आहे’, असा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला. तर काँग्रेसने दिग्विजय यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवले.