बर्लिन – अनेकवेळा भाडणं ही संपत्तीच्या कारणावरूनच होत असतात. कोणी कोणाला एक इंच जमीन किंवा एक पैसा देत नाही, पण जर्मनीतील एका महिलेने शेजार्यांना तब्बल 55 कोटींची संपत्ती दिल्याची माहिती समोर आली आहे.
जर्मनीतील बर्लिन शहरामधील वृद्ध महिला रेनाटे यांनी रातोरात 55.35 कोटींची मालमत्ता शेजार्यांना दिली आहे. शेजाऱ्यांना मालमत्ता दान करणार्या वृद्ध महिलेचा मृत्यू डिसेंबर 2019 मध्येच झाला आहे.
रेनाटे ह्या 1975 पासून पती अल्फ्रेड वेसल यांच्याबरोबर मध्य जर्मनीतील वाल्डोल्ड्सच्या वेपरफेल्डेन जिल्ह्यात राहत होत्या. त्यांचे पती अल्फ्रेड स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असत. त्यातून त्यांना बरेच पैसे मिळायचे.
2014 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि रेनाटे यांचेही वयाच्या 81 व्या वर्षी डिसेंबर 2019 मध्ये निधन झाले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रेनेट यांची बहीण जी त्यांची मूळ वारस होती त्यांचे आधीच निधन झाले होते.
शेजाऱ्यांना संपत्ती दिल्याची माहिती तेंव्हा उघडकीस आली जेंव्हा जिल्हा प्रशासनाने एप्रिलमध्ये त्यांच्या इच्छेविषयी माहिती दिली आणि रेनेट यांनी बँक बॅलन्स, शेअर्स आणि मौल्यवान मालमत्ता मागे ठेवल्याचे सांगितले. वृद्ध महिलेने अनेक शेजाऱ्यांच्या नावे मालमत्ता विभागली होती. मात्र, शेजार्यांना या पैशाचा उपयोग त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी करता येणार नसून परिसराच्या विकासासाठी करता येणार आहे.