इटलीतील सुपर मॉडेल जॉर्जिया एंड्रीयानी आणि बॉलीवूडमधील ऍक्ट्रेस जॉर्जिया एंड्रीयानीने आपल्या खास ग्लॅमरस लूकने आपला एक खास चाहता वर्ग निर्माण केला आहे. भारतातल्या एंटरटेन्मेंट करिअरमध्ये स्थान मिळवलेल्या जॉर्जियाने आता भारतीय भाषाही शिकायला सुरुवात केली आहे.
तिने हिंदी आणि पंजाबी बऱ्याच दिवसांपासून शिकायला सुरुवात केली आहे. आता तिने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये मराठी बोलण्याचा व्हिडिओ अपलोड करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. “कॅन यू स्पीक मराठी ? कॅन आय टेक युवर एक्झाम?’ असे तिला तिच्या मित्राने विचारले. तेंव्हा जॉर्जियाने “माझी परीक्षा काय घेशील? मी तर अगोदरच पास झाले आहे.’ असे अस्खलित मराठीत ऐकवून आश्चर्याचा धक्का दिला.
जॉर्जियाने दक्षिणेतील “कॅरोलिन और कामाक्षी’ या वेबसिरीजमध्ये काम करून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली आहे. मिकासिंगच्या “रुप तेरा मस्ताना’ या रिमिक्स अल्बममध्येही तिला बघितले गेले होते. आता ती लवकरच श्रेयस तळपदेबरोबर “वेलकम टू बजरंगपूर’मध्येही दिसणार आहे. जॉर्जियाकडे आणखीनही काही इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहेत. कदाचित त्यात एखादा मराठी सिनेमाही असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.