विविधा: विठ्ठलभाई पटेल

माधव विद्वांस

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रख्यात नेते, केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचे पूर्ण नाव विठ्ठल भाई झावरभाई पटेल असे होते. त्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1873 रोजी गुजरातच्या खेडा जिल्ह्यातल्या करमसद या गावी झाला.लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू होते.
ते पाच भावांपैकी तिसरे होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षा ते चार वर्षांनी मोठे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण करमसद व नाडियाद व येथे झाले. त्यांनी मुंबईत कायद्याचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी गोध्रा आणि बोरसाडच्या न्यायालयात कनिष्ठ वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

लहान वयातच त्यांचे लग्न झाले होते. त्यांचे लहान भाऊ वल्लभभाई पटेल देखील कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर कनिष्ठ वकील म्हणून काम करत होते आणि त्यांनाही बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जाण्याची इच्छा होती; परंतु मोठ्या भावासाठी त्याग करून स्वतःसाठी जमा केलेली रक्‍कम विठ्ठलभाईंना दिली शिवाय त्यांचा लंडन येथील वास्तव्याचा खर्चही त्यांनी उचलला. अशा प्रकारे विठ्ठल भाई पटेल बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. तीन वर्षे तेथे राहून बॅरिस्टर होऊन 1913 साली ते भारतात परतले.

परत आल्यावर मुंबई व अहमदाबादच्या न्यायालयात त्यांनी वकिली केली, आपले आकर्षक आणि प्रभावशाली व्यक्‍तिमत्त्व आणि कायद्याचे ज्ञान यामुळे अल्पावधीतच वकिली व्यवसायात प्रसिद्ध झाले आणि लक्ष्मी प्रसन्न झाली. पण सन 1915 मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. पत्नीच्या मृत्यूने त्यांचे जीवन बदलले, त्यानंतर ते सार्वजनिक कामांमध्ये भाग घेऊ लागले. परंतु लवकरच त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत प्रवेश केला. सुरुवातीस त्यांनी कॉंग्रेसमध्ये, बॉम्बे कॉर्पोरेशन, बॉम्बे धारा सभा अशा ठिकाणी काम केले.

त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. विठ्ठलभाई पटेल हे उत्कृष्ट वक्‍तेही होते. त्यांनी असहकार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतल्यानंतर 1922 मध्ये चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्या सहकार्याने “स्वराज पार्टी’ स्थापन केली. स्वराज पक्षाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विधानपरिषदांमध्ये प्रवेश करणे होते. 1923 मध्ये ते केंद्रीय विधानपरिषदेवर निवडून गेले आणि 24 ऑगस्ट 1925 रोजी ते अध्यक्ष झाले. त्यांच्या न्याय्य आणि धाडसी विचारसरणीची त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वावर छाप होती.

1930 मध्ये त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ मध्यवर्ती असेंब्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि ते कॉंग्रेसमध्ये परत आले. व स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊ लागले.त्यानंतर त्यांनाही नजरकैदेत ठेवले गेले. तुरुंगात त्यांचे आरोग्य ढासळले त्यांची प्रकृती खालावली आणि 22 ऑक्‍टोबर 1933 रोजी जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे त्यांचे निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.