पोलीस अधिकाऱ्याची भूमिका यशस्वी साकारणारे अभिनेते इफ्तेखार यांची आज जयंती. त्यांचे नाव सैयदना इफ्तेखार अहमद शरीफ. चित्रपटसृष्टीमध्ये फक्त इफ्तेखार म्हणून ओळखले जात असत. त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1920 रोजी जालंदर येथे झाला. त्यांचे वडील कानपूरमधील एका कंपनीत अधिकारी होते. फाळणीच्या वेळी इफ्तेखार यांचे बरेच जवळचे नातलग, त्यांचे आईवडील भावंडांसह पाकिस्तानमध्ये गेले. त्यांनी मात्र भारतातच राहणे पसंत केले.
त्यांची ओळख अभिनेता अशोककुमार यांच्याशी कलकत्ता येथे झाली होती आणि त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला व पत्नी व मुलींसह ते मुंबई येथे गेले. चित्रपटसृष्टीत पाय रोवण्यासाठी इतर कलाकारांप्रमाणे त्यांनाहीी संघर्ष करावा लागला. त्यांनी प्रामुख्याने हिंदी चित्रपटात इमानी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका वठविल्या. त्यांचा पोलीस इन्स्पेक्टरचा अभिनय लोकांना इतका भावला होता की विमानतळावर ड्युटीवरील पोलीस त्यांना सॅल्यूट ठोकीत.
मॅट्रिकनंतर त्यांनी लखनौ विद्यापीठातून चित्रकला पदविका मिळविली. चित्रकलेबरोबर इफ्तेखार यांना गाण्याची आवड होती. त्यांच्यावर प्रसिद्ध गायक कुंदनलाल सहगल यांचा प्रभाव होता. त्यावेळी कलकत्ता हे संगीताचे माहेरघर समजले जाई, एचएमव्ही कंपनीचे कार्यालय तेथे होते व संगीतकार कमल दासगुप्ता काम पाहात असत. त्यांनी त्यावेळी ऑडिशन्स घेतल्या व त्यासाठी इफ्तेखार कलकत्ता येथे गेले होते. त्यावेळी एचएमव्ही कंपनीने त्यांच्या दोन गाण्याच्या ध्वनिमुद्रिकाही केल्या होत्या.
मात्र, इफ्तेखार यांच्या व्यक्तिमत्त्वावर दासगुप्ता इतके प्रभावित झाले की त्यांनी अभिनेता म्हणून त्यांचे नाव एमपी प्रोडक्शन्सना सुचविले. दासगुप्ता यांना ते चित्रपटात जास्त चमकतील असे वाटले. इफ्तेखार यांनीही गाण्याचा नाद सोडला. इफ्तेखार गायक म्हणून यशस्वी झालेही असते पण ते पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत अभिनेते म्हणून नक्कीच यशस्वी झाले.
वर्ष 1937 मध्ये “कजाक की लाडकी’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. हिंदी चित्रपटसृष्टीत पोलीस अधिकारी म्हणजे इफ्तेखार असे समीकरण होऊन गेले. त्यांच्या अभिनय प्रवासात इफ्तेखार यांनी न्यायाधीश, काका, वडील, पोलीस अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, डॉक्टर किंवा ज्येष्ठ वकील म्हणून बहुविध भूमिका साकारल्या. त्यांनी सुमारे 400 चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांचे 4 मार्च 1995 रोजी मुंबई येथे निधन झाले.
माधव विद्वांस