पुणे -पुण्यातील करोनाबाधितांच्या नमुन्यांचे सातत्याने जनुकीय सर्वेक्षण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि भारतीय विज्ञान शिक्षण संशोधन संस्थेत (आयसर पुणे) करण्यात येणार आहे. त्यातून करोना विषाणूत काही बदल होत आहेत का याची पडताळणी केले जाणार आहे.
रॉकफेलर फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून पुणे, हैदराबाद, नवी दिल्ली आणि बंगळुरू या चार शहरांतील करोना नमुन्यांच्या जनुकीय सर्वेक्षणासाठी महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व हैदराबाद येथील सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी ही संस्था करत आहे. तर पुण्यातील जनुकीय सर्वेक्षणामध्ये पुणे नॉलेज क्लस्टर, आयसर पुणे, एनसीएल यांचा महत्त्वपूर्ण समावेश आहे.
देशातील करोना विषाणूचे उत्परिवर्तन शोधण्यासाठी विविध प्रयोगशाळांना एकत्र आणून “इन्साकॉग’ या प्रयोगशाळांच्या महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. इन्साकॉगच्या माध्यमातून देशभरातील जनुकीय क्रमनिर्धारणाचे काम करण्यात येत आहे. तर पुणे, हैदराबाद, नवी दिल्ली आणि बेंगळुरु या चार शहरांतील करोना विषाणू संसर्ग आणि त्यातील उत्परिवर्तन, बदलांवर लक्ष ठेवण्याचे काम या चार शहरांच्या महासंघांद्वारे केले जाणार आहे. त्यासाठी करोनाबाधितांचे नमुने संकलित करण्यात येतील.
या शहरांमधील प्रयोगशाळा त्या नमुन्यांचे जनुकीय सर्वेक्षण करून त्याचे निष्कर्ष इन्साकॉगला देतील. या चार शहरांतील जनुकीय सर्वेक्षणाच्या निष्कर्षांची इन्साकॉगकडून देशभरातील अन्य ठिकाणच्या जनुकीय सर्वेक्षणाच्या निष्कर्षांशी पडताळणी केली जाणार आहे. या माहितीचा आवश्यक ते धोरण ठरवण्यास मदत होणार आहे.