मुंबई : राजधानी दिल्लीसह ईशान्यकडील राज्यांमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात हिंसाचार उफाळला आहे. अशावेळी हिंसक झालेल्या आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरादार टीका केली आहे. अमित शाह हे जनरल डायरपेक्षा कमी नाहीत, असे मलिक यांनी म्हटले आहे.
Nawab Malik, NCP: The way General Dyer fired at the people in Jallianwala Bagh, Amit Shah is firing at citizens of the country in the same way. Amit Shah is no less than Dyer. What Uddhav ji said (“What happened at Jamia Millia Islamia, is like Jallianwala Bagh”) is correct. pic.twitter.com/2F8o6wMoFE
— ANI (@ANI) December 18, 2019
ज्या पद्धतीने जनरल डायरने जालियनावला बागमध्ये नागरिकांवर गोळीबार केला होता, त्याचप्रमाणे अमित शहा हे देशातील नागरिकांवर गोळीबार करत आहेत. अमित शाह हे जनरल डायरपेक्षा कमी नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे काही म्हटलेले आहे ते सर्व योग्यच आहे. असे आमदार मलिक यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमधील जामिया विद्यापीठात घडलेल्या प्रकारावर भाष्य करत, जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना केली होती. दिल्लीत जे काही झाले ते जालियनवाला बागची आठवण करुन देणारे आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
देशात अशांतता आणि अस्वस्थततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. दिल्लीत विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. जणू काही जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय? जालियनवाला बाग झाला तेव्हा ज्याप्रमाणे हिंसाचार घडला होता, तसंच वातावरण देशात पुन्हा निर्माण केलं जात आहे की काय? अशी भीती देशात आणि तरुणांच्या मनात आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.