सोक्षमोक्ष : “सलामी स्लाइसिंग’ नीती

– ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)

भारत-चीन दरम्यान सीमा तणावाची परिस्थिती सोडविण्यासाठी लडाखमध्ये दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असताना जनरल बिपिन रावत यांनी चीनच्या सलामी स्लाइसिंग रणनीतीविषयी भाष्य केले होते.

गेल्या काही दिवसांपासून अडीचशे चिनी मच्छीमार बोटी फिलिपाइन्सच्या समुद्री हद्दीमध्ये घुसल्या आहेत आणि तिथून परत जायचे नाव घेत नाहीत. फिलिपाइन्सने त्यांना परत जाण्याकरता सांगितले आहे, परंतु चीन ऐकायला तयार नाही. चीन सलामी स्लाइसिंग या डावपेचाचा वापर अनेक वर्षांपासून करत आहे. यामध्ये नेमके काय केले जाते? तर चीन जमिनीवरती आणि समुद्रामध्ये हळूहळू, काही वेळा सांगून, चीन आपली सीमा पुढे सरकतो, थोडी थोडी जमीन बळकवत राहतो. पहिली झालेल्या सलामी स्लाइसिंगचे पुढे अजून मोठ्या सलामी स्लाइसिंगमध्ये रूपांतर केले जाते.अशाप्रकारे चीनने अक्‍साई चीनवरती पूर्णपणे कब्जा केला आहे आणि साऊथ चायना समुद्रामध्ये 80 टक्‍के समुद्रावर आता चीनचे अधिपत्य आहे.

सैन्याच्या भाषेमध्ये, सलामी स्लाइसिंग या धोरणात बऱ्याच छोट्या कृती केल्या जातात. जमीन बळकावत राहणे, धमकावणे, ऐतिहासिक किंवा इतर पुरावे देऊन नवीन प्रदेश ताब्यात घेणे, पुनःपुन्हा निष्फळ चर्चा करत राहणे हा खेळ खेळला जातो. सीमा विवाद कधीच सोडवला जात नाही, कारण अजून जास्त जमीन बळकवायची असते.

समुद्रामध्ये साउथ ईस्ट एशियामधल्या सगळ्या देशांच्या एक्‍सक्‍लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये चीनने सलामी स्लाइसिंगद्वारे प्रवेश केलेला आहे. सीमांवरती चीनने या डावपेचाचा वापर भारत, नेपाळ, भूतान, पाकिस्तान या देशांविरुद्ध केलेला आहे. नेपाळमध्ये चीनच्या बाजूने असलेले कम्युनिस्ट सरकार असूनसुद्धा चीनने जमीन बळकावली आहे.

सलामी स्लाइसिंग केल्यानंतर दुसऱ्या राष्ट्राला चीन वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव देतो. अनेक प्रकारची दमदाटी करून आपण केलेली घुसखोरी त्यांना मान्य करायला भाग पाडतो. जर त्या देशाचा दबाव फारच वाढला तर जिथे चार पावले आत आले होते, तिथून ते दोन पावले मागे जातो. जसे भारताच्या बाबतीत घडले. परंतु काही घुसखोरी ही कायमची होऊन जाते. भारत एकुलता एक देश आहे ज्याने चिनी सलामी स्लाइसिंगला लष्करीरीत्या थांबवण्याचा प्रयत्न केला आणि चीनला गलवान खोऱ्यात, पेन्गोंसो तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावर आणि कैलास पर्वतावर एक मोठा धक्‍का दिला. मात्र ही हिम्मत इतर कुठल्याही देशाने दाखवलेली नाही.

सलामी स्लाइसिंगमध्ये सीमा हळूहळू पुढे गेल्यामुळे कुठलाही देश एकदम लढाई करायला तयार नसतो. हायब्रिड युद्धाचा वापर करून चीन जगाला या सीमांवर लष्करी पर्याय वापरण्यापासून थांबवतो. म्हणजे लढाई न करता चीनने अनेक देशांच्या सीमांचा नकाशाच बदलला आहे. ऐवढेच नव्हे तर हेच डावपेच चीन यापुढे मध्य अशिया आणि रशियातसुद्धा वापरणार आहे.

सलामी स्लाइसिंगबरोबर अपप्रचार, दुष्प्रचार, मानसिक युद्ध, धमक्‍या देऊन देशांना घाबरवणे, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा गैरवापर करणे हेसुद्धा केले जाते. साउथ चायना समुद्रामध्ये चिनी कोस्ट गार्डच्या मदतीने सिव्हिलियन मच्छिमार बोटी घेऊन पुढे सरकतो आहे. हेच वेगवेगळ्या समुद्री भागांमध्ये केले जात आहे, परंतु केवळ सलामी स्लाइसिंग केलेल्या भागांमध्ये गस्त घालून किंवा पेट्रोलिंग करून आपली सीमा पुढे सरकणार नाही हे माहीत असल्याने तिथे कायमचे वर्चस्व प्रस्थापित करणे गरजेचे आहे.

खडकांच्या वरती भर टाकून तिथे कृत्रिम बेटांची निर्मिती केली जाते आणि नंतर तिथे स्वतःच्या मिलिटरी पोस्ट निर्माण करणे, शस्त्रांना तैनात करणे किंवा कृत्रिम हेलिपॅड किंवा विमानांच्या धावपट्ट्या तयार करणे असे प्रकार सुरू आहेत. साउथ चायना समुद्रात सलामी स्लाइसिंगचे डावपेच वापरून चीनने आपल्या समुद्री सीमा पुष्कळ पुढे नेल्या आहेत. आता चीनने कृत्रिम बेटांवरती मानवीवस्ती स्थापन करणे, भाज्या लावणे, मच्छिमारांना तिथे वेळोवेळी आणणे, असे प्रकार सुरू केले आहेत.

काही महिन्यांपूर्वी चीनने समुद्रामध्ये दोन नवीन जिल्हे प्रस्थापित केले आणि त्यांची नावे आहेत पारसल आणि स्पार्टली. जी या आधी इतर देशांच्या ताब्यात होती. चीनने लगेच कायदा पास करून आपल्या कोस्ट गार्ड म्हणजे तटरक्षक दलाला कायदेशीररित्या या समुद्रामध्ये आलेल्या इतर देशांच्या बोटीवर फायरिंग करण्याचे अधिकार दिलेले आहेत.

थोडक्‍यात, चीनने शस्त्रांचा वापर न करता, बंदुकीचा वापर न करता सलामी स्लाइसिंगद्वारे जगाविरुद्ध एक नवीन प्रकारचे युद्ध सुरू केले आहे आणि त्याला प्रत्युत्तर देणे भारत सोडून इतर कुठल्याही देशाला जमलेले नाही. भारताचे सैन्य प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटले आहे की, आम्ही चीनच्या सलामी स्लाइसिंग डावपेचांना पराभूत करू, परंतु सगळ्या देशांच्या सीमांवरती त्यांचे सैन्य तैनात नसल्यामुळे सलामी स्लाइसिंग थांबवणे तितकेसे सोपे नाही. या सलामी स्लाइसिंगच्या डावपेचांना थांबवायचे असेल तर साउथ चायना समुद्रामधल्या सगळ्या देशांना आपल्या सीमांवर आपली सुरक्षा दल किंवा तटरक्षक दलाची तैनाती खूप जास्त वाढवावी लागेल. परंतु जी जुनी घुसखोरी झाली आहे त्याचे काय?

क्‍वाड को-ऑपरेशनसारखे मजबूत मिलिटरी आलायंस तयार करावे लागेल, ज्यामुळे एकत्रित कारवाई करून चिनी सलामी स्लाइसिंग थांबवण्यात या देशांना यश मिळेल. त्यांना एकत्रित करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. कारण चाणक्‍याने म्हटल्याप्रमाणे, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. या देशांना मदत करून भारत चीनला “टु फ्रंट’ लढाई लढण्यात भाग पाडू शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.