मुंबई – रिलायन्स रिटेल या कंपनीत जनरल अटलांटिक या कंपनीने 3,675 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या अगोदर सिल्वर लेक कंपनीने रिलायन्स रिटेलमध्ये 7,500 कोटी रुपयांची तर केकेआर या कंपनीने 5,550 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
या गुंतवणुकीच्या प्रमाणानुसार रिलायन्स रिटेलचे बाजार मूल्य सध्या 4.2 लाख कोटी रुपयाचे असल्याचे समजले जाते. रिलायन्स अटलांटिकने रिलायन्स जिओ या कंपनीतही 6,598 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. रिलायन्स जिओमध्ये विविध गुंतवणूकदारांनी 1.52 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता रिलायन्स कंपनीने रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
ज्या गुंतवणूकदारांनी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे, त्या सर्वांना रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देण्यात आली असल्याचे बोलले जाते. या व्यवहाराबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, भारतातील रिटेल क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या आधारावर आमूलाग्र बदलाची गरज असून आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. यामुळे उत्पादक आणि ग्राहकांचाही लाभ होऊ शकेल.