भेदरलेल्या भाजपाकडून सर्वसाधारण सभा तहकूब

संग्रहित छायाचित्र....

नगरसेवकांच्या आक्रमकतेचे भय ; स्वकीयांनीही
केली होती तयारी

सत्ताधारी नगरसेवकांत अस्वस्थता
शहरातील विविध प्रश्‍नांवरून सत्ताधारी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही ठराविक मंडळीच महापालिका चालवित आहेत. त्यांच्या चुकीच्या निर्णयांचा फटका आम्हाला बसत असून नागरिकांना काय उत्तरे द्यायचे हेच समजत नसल्याची भावना काही नगरसेवकांनी “प्रभात’शी बोलताना व्यक्‍त केली. पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे पक्षाचीही बदनामी होत असल्याचे या नगरसेवकांनी सांगितले. 

पिंपरी  – शहरातील कचरा समस्या, सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांचीच होत नसलेली कामे, वायसीएममधील चुकीच्या नियुक्‍त्या, बोकाळलेला भ्रष्टाचार आणि शहरात निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्‍न यावरून विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नगरसेवकही आक्रमक होणार असा अंदाज आल्याने भेदरलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी आजची सर्वसाधारण सभा तहकूब केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 20) आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.

माजी उपमहापौर शेषाप्पा नाटेकर यांच्यासह राज्य व देशातील मरण पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी अचानकपणे सभा तहकुबीची सूचना मांडली. महापौरांनी तत्काळ ही सूचना मान्य करत गुरुवार दि. 25 जुलै दुपारी 1 वाजेपर्यंत आजची सभा तहकूब केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना पक्षनेते एकनाथ पवार यांनी शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी नावे निश्‍चित झालेली नसल्याचे कारण दिले.

मात्र शिक्षण मंडळाचे कारण हे केवळ कारण असल्याचे स्पष्ट झाले असून नगरसेवकांच्या आक्रमकतेची जाणीव झाल्यामुळे सभा तहकूब करून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी पळ काढल्याचा आरोप विरोधकांनी केला. विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दत्ता साने, मयूर कलाटे, राजू मिसाळ, जावेद शेख यांनी सत्ताधाऱ्यांवरी जोरदार आरोप केले.

ते म्हणाले, एकेकाळी स्मार्ट सिटीचा पुरस्कार पटकाविणाऱ्या शहराला सत्ताधाऱ्यांनी अक्षरश: कचऱ्याचे शहर बनविले आहे. कचऱ्यातील भ्रष्टाचारावर आमच्यासह सत्ताधारी नगरसेवकांच्या नाराजीचा परिणाम पहावयास मिळाला असता. गेल्या अडीच वर्षांत भाजपाला कचऱ्याची समस्या सोडविता आली नाही, त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत. शास्तीकराचा मुद्दा, वायसीएममधील डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेला रुग्णाचा मृत्यू यावर सदस्य आक्रमक पवित्रा घेणार होते. सत्ताधाऱ्यांकडे उत्तरच नसल्याने त्यांनी पोबारा केल्याचा आरोप राजू मिसाळ, जावेद शेख यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)