राष्ट्रपतींबाबत गेहलोत यांचे वादग्रस्त वक्‍तव्य 

जयपूर/ नवी दिल्ली – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्‍तव्य केले. मात्र टीका व्हायला लागल्यावर त्यांनी आपले वक्‍तव्य मागेही घेतले. मात्र त्यांच्या या वादग्रस्त वक्‍तव्यामुळे भाजपमधून त्यांच्यावर टीकेची झोड उठायला लागली आहे. राष्ट्रपती पदासाठी “एनडीए’ने लालकृष्ण आडवाणी यांच्याऐवजी रामनाथ कोविंद यांची निवड केली. त्यामागे रामनाथ कोविंद हे मागास असल्याचेच कारण आहे, असे गेहलोत म्हणाले होते.

जयपूरमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना गेहलोत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्‍तीचा संबंध गुजरातमध्ये 2017 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणूकांशी जोडला. गुजरातमधील निवडणूकीमध्ये पराभव होण्याच्या शक्‍यतेने पंतप्रधानांना ग्रासले होते. तेंव्हा अमित शहा यांनी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवण्याविषयी सुचवले असावे. आडवाणी यांना राष्ट्रपती बनवता आले असते. लोकांना तशीच अपेक्षा होती. कारण अडवाणी त्या पदासाठी योग्य होते. पण त्यांना वगळले गेले. हा भाजपचा अंतर्गत मुद्दा आहे पण त्याबाबत छापून आले होते, असे गेहलोत म्हणाले.

गेहलोत यांच्या या वक्‍तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली. कोविंद हे घटनात्मक पदावर असताना त्यांच्याविषयी जातीयवाचक वक्‍तव्य अपमानास्पद आहे. गेहलोत यांच्या वक्‍तव्यातून त्यांची दलितविरोधी मानसिकता दिसून येत असल्याची टीका भाजप प्रवक्‍ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी केली. त्यावर गेहलोत यांनी आपल्या वक्‍तव्याचा विपर्यास केला गेल्याची सावरासावर केली. राष्ट्रपतींबाबत आपल्याला नितांत आदर आहे. त्यांच्या साधेपणा आणि सौम्यभाषेबाबत आपल्याला व्यक्तिशः आदर असल्याचे गेहलोत म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.