जम्मू – जम्मू-काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली शहा गिलानी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत गिलानी “हम पाकिस्तानी हैं और पाकिस्तान हमारा है’ अशा घोषणा देताना दिसत आहे. हा व्हिडीओ मे महिन्यातील आहे. मात्र, जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी फुटीरतावादी नेते केंद्र सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर त्यांच्या विरोधात तिखट प्रतिक्रीया पहायला मिळत आहेत.
या व्हिडिओमध्ये गिलानी एका सभेमध्ये प्रक्षोभक भाषण देताना दिसत आहेत. याच भाषणादरम्यान त्यांनी “इस्लामवरील प्रेमामुळे आणि इस्लामशी असलेल्या संबंधांमुळे आपण पाकिस्तानी आहोत, पाकिस्तान आपला आहे’ अशी घोषणाबाजी केली. गिलानी यांनी घोषणा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनाही घोषणा दिल्या. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हुर्रियत नेते केंद्र सरकारबरोबर चर्चेसाठी तयार आहेत, असे म्हटले आहे. मलिक यांच्या या वक्तव्यानंतर हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.