नाशिक : नाशिकमधील प्रसिद्ध गायिका गीता माळीचा आज (14 नोव्हेंबर) अपघाती मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-नाशिक महामार्गावरील एकता हॉटेलसमोर घडला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. माळी यांच्या निधनाने नाशिकमध्ये कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
या भीषण अपघातात गीता माळीचे पती विजय माळीही जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईहून नाशिक महामार्गावरुन जात असताना अचानक रस्त्यात गाडीच्या आडवे कुत्रा आल्याने त्याला वाचविण्याच्या नादात कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एचपी गॅसच्या टॅंकरला धडकली. या घटनेत गीता माळीचे निधन झाले, तर विजय माळी गंभीर जखमी झाले.
गीता माळी गेल्या तीन महिन्यापासून अमेरिकेत गेल्या होत्या. अमेरिकेहून त्या मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांचे पती विजय माळी यांच्यासोबत त्या कारने नाशिकला येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.