बेरोजगारीवरून पुन्हा शिवसेनेचा बाण; जाहिरातबाजी न करण्याचा भाजपला सल्ला

मुंबई: जीडीपी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर तिव्र शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. महाराष्ट्र व देशाचे चित्र विदारक आहे, बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे शब्दभ्रमाचे खेळ थांबवावे आणि जाहिरातबाजी करु नये, असा सल्ला दिला आहे.

“दिल्लीत नवे सरकार कामास लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या चित्रावर आव्हानांचे काळे ठिपके स्पष्ट दिसू लागले आहेत. देशाची आर्थिक घडी साफ विस्कटली आहे. आभाळ फाटले आहे. त्यामुळे शिवणार तरी कुठे अशी अवस्था झाली आहे. मोदींचे सरकार येत आहे म्हटल्यावर सट्टा बाजार आणि शेअर बाजार उसळला, पण “जीडीपी’ घसरला व बेरोजगारीचा दर वाढला हे लक्षण काही चांगले नाही. बेरोजगारीचे संकट असेच वाढत राहिले तर काय करायचे यावर फक्त चर्चा करून व जाहिरातबाजी करून उपयोग नाही, कृती करावी लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

“देशात बेरोजगारीचा आगडोंब उसळला आहे. “नॅशनल सॅम्पल सर्व्हे’च्या आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर हा 6.1 टक्के झाला. मागील हा आकडा 45 वर्षांतला सर्वात जास्त आहे. त्यावर केंद्रीय कामगार मंत्रालयानेदेखील आता शिक्कामोर्तब केले आहे. आपण दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्या हिशेबाने पाच वर्षांत किमान दहा कोटी रोजगाराचे लक्ष्य पार करायला हवे होते. ते झालेले दिसत नाही व त्याची जबाबदारी नेहरू-गांधींवर टाकता येणार नाही, असा शब्दांत सुनाविण्यात आले आहे.

“चीनमध्ये काम करणाऱ्या 300 अमेरिकी कंपन्या म्हणे तेथील गाशा गुंडाळून भारतात येत आहेत, असे निवडणुकीपूर्वी चित्र उभे केले. मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर व्यापारी निर्बंध लादले आहेत. हे चित्र संभ्रमात टाकणारे आहे. महागाई, बेरोजगारी, घटते उत्पादन व बंद पडत चालेले उद्योग या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही. अर्थव्यवस्था संकटात आहे. नव्या अर्थमंत्र्यांनी मार्ग काढावा, असे आवाहनही शिवसेनेने केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.