Mango Season 2026 – मावळ तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस आणि अनुकूल हवामान लाभल्याने गावरान आंब्याच्या झाडांना मुबलक मोहर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. योग्य प्रमाणात झालेला पाऊस, त्यानंतर पडलेली थंडी आणि सध्या असलेले कोरडे, उबदार हवामान यामुळे आंब्याच्या झाडांवर फुलोरा चांगल्या प्रकारे आला आहे. परिणामी यंदा आंबा उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील आंबा उत्पादनावर हवामानाचा मोठा प्रभाव असतो. थंडी जास्त असल्यास किंवा अवकाळी पाऊस पडल्यास आंब्याच्या मोहरावर विपरीत परिणाम होतो. मात्र यंदा हवामानाने शेतकऱ्यांना साथ दिल्याने गावरान आंब्याच्या झाडांवर भरघोस मोहर दिसून येत आहे. नाणे मावळ, आंतर मावळ, तसेच इतर ग्रामीण भागातील अनेक बागांमध्ये झाडे फुलांनी बहरली आहेत.गेल्या काही वर्षांत बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम होत होता. काही वर्षी अवकाळी पावसामुळे मोहर गळून पडला, तर काही वर्षी अतिथंडीमुळे फुलोरा कमी झाला. मात्र यंदा हवामानातील संतुलनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. झाडांना आलेल्या भरघोस मोहरामुळे यावर्षी चांगले उत्पादन मिळेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच मावळ तालुक्यातील तळेगाव, वडगाव आणि लोणावळा या बाजारपेठांमध्ये गावरान आंबा दाखल होण्याची उत्सुकता ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. यंदा उत्पादन वाढल्यास बाजारात आंब्याचा पुरवठा मुबलक राहण्याची शक्यता असून, त्यामुळे ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचा आंबा सहज उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या शेतकरी बागांवर लक्ष ठेवून रोगराईपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करत आहेत.गावरान आंबा उत्पादन हा मावळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा पूरक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने आंबा बागा जपत आहेत, तर काहींनी सुधारित लागवड पद्धतीचा अवलंब करून उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे. यंदा आलेल्या भरघोस मोहरामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात चांगला भाव मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.