पुणे – रत्नागिरी हापूसचा हंगाम संपत आल्यानंतर आता गावरान आणि गुजरातच्या केसर आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. मागील पंधरा दिवसांपासून मार्केटयार्ड फळबाजारात केसर आंब्याची आवक सुरू झाली आहे.
फळबाजारात गावरान आंब्यासह केसर आंब्याला मागणी चांगली आहे. घाऊक बाजारात केशर आंब्यास किलोस
40 ते 60 रुपये भाव मिळत आहे. गुजरातच्या जुनागड, वलसाड, वापी, धरमपूर, देगाम या भागातून तर महाराष्ट्रातून सांगली, सोलापुर, पुणे जिल्ह्यातील मुळशी, भोर, वेल्हा या भागातून केसर आंब्याची आवक होत आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात केसर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. सध्यस्थितीत मार्केटयार्डातील फळबाजारात स्थानिकसहा गुजरातमधून केसर आंब्याच्या दररोज चारशे ते पाचशे पेट्या बाजारात येत आहेत. किरकोळ बाजारात शंभर रुपये किलोने आंबा मिळत आहे, अशी माहिती कर्नाटक आणि केसर आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.
उरसळ म्हणाले, “महाराष्ट्रात हापूस आंब्याला जो मान आहे. तोच मान गुजरातमध्ये केसर आंब्याला राहतो.
यंदा केसर आंब्याचे उत्पादन समाधानकारक आहे. मे महिन्याच्या अखेरीस गुजरात येथून लांबडा केसर आंबा बाजारात दाखल होण्यास सुरवात होते. केसर दिसायला पिवळा आणि आकाराने थोडासा लांबट आणि टोकदार असतो. हा आंबा चवीलाही गोड असतो. हापूसनंतर केसर आंब्याला अधिक मागणी असते. काही प्रमाणात हा आंबा निर्यातही केला जातो.
जून ते जुलैपर्यंत या आंब्याचा हंगाम सुरू राहतो. पाऊस पडायला सुरूवात झाली की अनेक लोक हापूस खात नाहीत. त्यानंतर केसर आंब्याला मागणी वाढते. आठवडाभरात आवक आणखी वाढेल. त्यानंतर आंब्याचे भाव खाली येतील.’