मुंबई: शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेख हा अपूर्ण माहितीवर आधारित असून त्यातून कॉंग्रेस पक्षाविषयी चुकीचा संदेश दिला गेला आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. या अग्रलेखात कॉंग्रेस पक्षाची तुलना ही जुन्या कुरकुरणाऱ्या खाटेशी करण्यात आली आहे.
आघाडीतील अशा कुरकुरणाऱ्यांशी उद्धव ठाकरे यांना जुळवून घ्यावे लागेल असेही यात नमूद करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, आम्हाला आमचे काही म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे मांडायचे आहे. हे मुद्दे जनतेच्याच हिताचे आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी नाहीत, मुख्यमंत्री हे या सरकारचे प्रमुख आहेत. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तेही आमच्यावर समाधानी दिसतील असेही थोरात म्हणाले.
त्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्राला आणखी एक अग्रलेख लिहावा लागेल अशी नर्म विनोदी टिप्पणीही त्यांनी केली. बाळासाहेब थोरात यांनी सरकारच्या कामाविषयी असमाधान व्यक्त केल्यानंतर माजी मुख्यमंत्री व विद्यमान मंत्री अशोक चव्हाण यांनीही सरकार चालवताना आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार केली होती.
त्यावर शिवसेनेच्या मुखपत्रात वरील टिप्पणी करण्यात आली आहे. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्ती 12 जागा भरायच्या आहेत. या जागा समसमान पद्धतीने वाटून घ्याव्यात असा कॉंग्रेसचा आग्रह आहे त्यावरून सध्या कुरबूर सुरू आहे असे सांगण्यात येते.