प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हि नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. तिची लोकांमध्ये मोठया प्रमाणात क्रेझ आहे. मात्र यावेळी गौतमी पाटील एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटील कोणत्या कार्यक्रमात नाही तर चेहऱ्याला स्कार्फ आणि अतिशय साध्या ड्रेसमध्ये चक्क न्यायालयात दिसली. तिला आज एका प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण?
अहमदनगरमध्ये 2023 मध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. पण तरीही कार्यक्रम पार पडला होता. हाच कार्यक्रम गौतमीला भारी पडला आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी गौतमी पाटील न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्टात हजर राहणं अनिवार्य होतं. अन्यथा तिच्यासाठी वॉरंटदेखील निघू शकलं असतं. असं असताना आज शेवटी अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर राहावं लागलंच. न्यायमूर्तींनी तिची बाजू एकून घेत तिला अटी-शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला.
कोण आहे गौतमी पाटील ?
धुळ्याच्या शिंदखेडा गावात गौतमी पाटील हिचा जन्म झाला. गौतमीचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी तिच्या वडिलांनी आईला सोडून दिलं. त्यामुळे ती आपल्या आजोळीच शिंदखेडा येथे लहानाची मोठी झाली. गौतमी आठवीला असताना उदरनिर्वाहासाठी तिचं कुटुंब पुण्यात आलं. दरम्यान आई छोटी-मोठी कामं करून घर चालवायची.
या काळात गौतमीच्या आईचा PMT बसमधून पडून अपघात झाला. डोक्याला टाके पडल्यामुळे त्यांना आता कामावर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे गौतमीने घराचा भार खांद्यावर घेतला. घरच्या परिस्थितीने काम करणं भाग होतं. गौतमी सुरुवातीपासून पुण्यातील विश्व कला नृत्य अकादमी येथे नृत्याचं प्रशिक्षण घेत होती. त्यामुळे नृत्य क्षेत्रातच काम करून गुजराण करण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले.
लावणीच्या क्षेत्रात पूर्वी आपल्या संपर्कातील कुणीच नव्हतं. सुरुवातीच्या काळात बॅक डान्सर म्हणून काम केलं. नंतर पुढे आघाडीची लावणी कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळत गेली. आणि याच संधीचे सोने करत तिने प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माण केली आहे.