पुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटनाशी संबंध असल्याच्या प्रकरणात संशयित आरोपी गौतम नवलाखा यांना दोन डिसेंबरपर्यंत अटक करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत. गौतम यांचा पुणे सत्र न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन फेटाळला होता.
यापुढे आनंद तेलतुंबडे आणि नवलाखा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी होणार आहे. येथील न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्यासाठी पुन्हा तीन दिवसांचे अंतरिम संरक्षण मिळावे यासाठी अर्ज नवलाखा यांनी केला होता.
मात्र त्यांच्याविरोधात पोलिसांना प्रथमदर्शनी सबळ पुरावे मिळून आले असून पुढील तपासकरिता त्यांना अटक करणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत त्यांना वेळोवेळी न्यायालयाने अटकपूर्व संरक्षण दिलेले आहे, असे नमूद करीत न्यायालयाने तोही अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे