गौतम नवलखा यांना तूर्त दिलासा

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : 2 मेपर्यंत अटकेची कारवाई नाही
मुंबई – पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे माओवादी असल्याच्या संशय असलेल्या गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने तूर्त दिलासा दिला आहे. नवलखा यांच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेची दखल घेत याचिकेची अंतिम सुनावणी 2 मेपर्यंत तहकूब ठेवली. तो पर्यंत त्यांच्याविरोधात कारवाई न करण्याचे न्यायालयाने यापूर्वी पुणे पोलिसांना दिलेले आदेश कायम ठेवले.

माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करुन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकील ऍड. अरूणा कामत-पै यांनी याचिकेला जारेदार विरोध केला. आमच्याकडे नवलखा यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत, असा दावा केला. न्यायालयाने नवलखा यांना दिलेला अटकेपासून दिलेला दिलासा सतत कायम होत असल्याने तपास यंत्रणेच्या कारवाईत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे न्यायालयाने नवलखा यांना अटकेपासून दिलेला दिलासा काढून घ्यावा, अशी मागणी मागणी केली.
मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावत याचिकेवर दि. 2 मे रोजी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केली. तोपर्यंत नवलखा यांच्याविरोधात कारवाई करून नका, असेही पुणे पोलिसांना बजावले.

Leave A Reply

Your email address will not be published.