गौतम गंभीरला दिल्लीतून भाजपची उमेदवारी

नवी दिल्ली – भाजपने अपेक्षेप्रमाणे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. त्याला पूर्व दिल्ली मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आले आहे.

गंभीरने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासूनच तो निवडणूक मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा होती. ती चर्चा खरी ठरवताना भाजपने सोमवारी महेश गिरी यांच्याऐवजी उमेदवार म्हणून गंभीरला पसंती दिली. आता पूर्व दिल्लीत अरविंदरसिंग लवली (कॉंग्रेस), आतिषी (आप) आणि गंभीर यांच्यात तिरंगी लढत होईल. दरम्यान, भाजपने मीनाक्षी लेखी यांना पुन्हा तिकीट दिले. त्या नवी दिल्ली मतदारसंघातून पुन्हा नशीब आजमावणार आहेत. त्यांची लढत कॉंग्रेसचे अजय माकन आणि आपचे ब्रजेश गोयल यांच्याशी होईल. भाजपने आतापर्यंत दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांपैकी सहा जागांवरील उमेदवार निश्‍चित केले आहेत. हर्ष वर्धन, मनोज तिवारी, प्रवेश वर्मा आणि रमेश बिधुरी या विद्यमान खासदारांची उमेदवारी पक्षाने रविवारी जाहीर केली. उत्तर पश्‍चिम दिल्ली या एकमेव मतदारसंघातील भाजपचा उमेदवार जाहीर होणे आता बाकी आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सर्व सात जागा जिंकल्या होत्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.