गौतम बॅंकेच्या सभासदांना मिळणार लाभांश

कोपरगाव – गौतम सहकारी बॅंक 2009 सालापासून सरकारच्या सुधारित एन.पी.ए.च्या मापदंडामुळे तोट्यात गेली होती. मात्र या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आमदार आशुतोष काळे यांनी चालू वर्षापासून बॅंकेच्या सभासदांना 8 टक्के लाभांश देण्यास रिझर्व्ह बॅंकेकडून मान्यता मिळविली असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते व मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिली आहे.

जवळपास 2002 सालापासून सभासदांना लाभांश मिळत नव्हता. अत्यंत कठीण परिस्थितीत आ. काळे यांनी बॅंकेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यांनी बॅंकेचा सर्व संचित तोटा भरून काढताना 2018-19 या आर्थिक वर्षात बॅंकेला 58 लाख 44 हजार रुपयांचा नफा मिळवून निव्वळ एन.पी.ए. शे. प्रमाण 4 टक्केच्या आत आणला आहे. मागील काही वर्षापासून सभासदांना लाभांश देण्याचा मनोदय त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलून दाखविला होता, मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांमुळे सभासदांना लाभांश देता आला नाही.

परंतु यावर्षीच्या आर्थिक सर्वसाधारण सभेत आ. काळे यांनी चालूवर्षी सभासदांना लाभांश देणार असा शब्द दिला होता. आपला दिलेला शब्द खरा दाखवत त्यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार बॅंकेच्या आर्थिक परिस्थितीला शिस्त लावल्यामुळे बॅंकेची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली होती. रिझर्व्ह बॅंकेकडे सतत पाठपुरावा करून अखेर 31 मार्च अखेरच्या भागभांडवलावर 8 टक्के लाभांश देण्याची मान्यता मिळविली आहे. त्यामुळे बॅंक लवकरच 15 हजार 534 सभासदांना 8 टक्‍के दराने 36 लाख 84 हजार रुपयांचे वाटप करणार आहे.

आज बॅंकेच्या ठेवी 9,051.97 लाख, कर्जवाटप 5,612.25 लाख, गुंतवणूक 4,146.93 लाख, राखीव व इतर निधी 758.80 लाख आहेत. बॅंकेची आर्थिक स्थिती भक्कम असून बॅंकेचा ऑडीट वर्ग “अ’ आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आ. आशुतोष काळे यांनी बॅंकेच्या सभासदांमध्ये लाभांश मिळणार असल्याने आनंद होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.