Gautam Adani : उद्योजक गौतम अदानी यांचा लहान मुलगा जीत विवाहबंधनात अडकला आहे. जीतने दिवा शाहशी लग्न केले आहे. जीत व दिवा यांचे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले. गौतम अदानी यांनी यापूर्वीच मुलाचा विवाह साध्या व पारंपारिक पद्धतीने करणार असल्याचे म्हटले होते. त्या प्रमाणेच हा विवाह पार पडला. विशेष म्हणजे मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने अदानींनी ‘महादान’ केले आहे.
अब्जाधीश गौतम अदानी यांनी मुलाच्या लग्नानिमित्ताने 10,000 कोटी रुपयांचे दान दिले आहे. ही रक्कम आरोग्य, शिक्षण व कौशल्य विकासासंबंधित उपक्रमांवर खर्च होणार आहे. अदानी समूहाच्या वतीने देण्यात आलेला हा निधी जागतिक दर्जाचे रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उपलब्ध करून देण्यासाठी वापरलेा जाणार आहेत.
जीत आणि दिवाच्या लग्नाबाबत माहिती देत गौतम अदानी यांनी सांगितले की, परमपिता परमेश्वराच्या आशीर्वादाने जीत आणि दिवा विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत. हे लग्न अहमदाबादमध्ये नातेवाईकांच्या उपस्थिती पारंपारिक पद्धतीने पार पडले. हा एक लहान आणि अत्यंत खाजगी समारंभ होता, त्यामुळे आम्ही इच्छित असतानाही सर्व शुभेच्छुकांना आमंत्रित करू शकलो नाही.
गौतम अदानी यांचा लहान मुलगा जीत आणि दिवा शाह यांनी लग्नापूर्वी ‘मंगल संकल्प’ केला. यामध्ये 500 दिव्यांग महिलांच्या लग्नासाठी 10-10 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. जीत आणि दिवा हे दरवर्षी 500 दिव्यांग महिलांच्या लग्नासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये आर्थिक सहाय्य देणार आहेत.
जीत अदानीबद्दल सांगायचे तर त्याच्याकडे अदानी समूहांतर्गत मोठी जबाबदारी आहे. तो सध्या सहा आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहे. तसेच, नवी मुंबईमध्ये सातव्या विमानतळाच्या निर्मितीची जबाबदारीही त्याच्याकडे आहे.तो युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनियाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाईड सायन्सेसचा माजी विद्यार्थी आहे.